Wednesday, March 7, 2012

!!!!!!आनंदोत्सव होळीचा !!!!!

**महाराष्ट्र राज्य हे सहयाद्री, सातपुडा आणि विंध्य पर्वतराजीत असलेलं प्रगतीच्या वाटेवरील एक राज्य. याच सातपुडा पर्वताच्या द-याखो-यातील विस्तीर्ण अशा वनश्रीनं नटलेलं मेळघाटचं अरण्य. निसर्गसख्यांचं माहेर. कारण येथे आहेत साग वृक्षांची आभाळाशी स्पर्धा करणारी झाडं. त्यामध्ये आहे वाघ, बिबट,अस्वल,रानकुत्रे,सांबर इ. वन्यप्राण्यांचे आश्रयस्थानं.

**“कोरकू” ही आदिवासी जमात याच मेळघाटात आहे. ही जमात “मुंडा”किंवा “कोलारीयन” वंशाशी संबंधीत आहे. अर्थात काही ठिकाणी “कोरवा” हया नावाने ओळखल्या जाते. मध्य प्रदेशातील होशंगाबाद,निमार आणि बैतूल जिल्हयात तर अमरावती जिल्हयातील मेळघाट परिसरातील अतिदुर्गम भागात या जमातीचे वास्तव्य आहे. धार्मिक आणि मंत्रतंत्रावर विश्वास ठेवणारे हे लोक असून महादेव ही त्यांची प्रमुख देवता आहे. जंगलाचा राजा वाघालाही ते पुजनीय मानून त्याची पूजा करतात. म्हणून वाघाला ते “कुलामामा” असं म्हणतात. त्यामुळं हा आदिवासी वाघाची कधीच शिकार करत नाही.

**कोरकुंचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. डोंगराच्या उतरंडीवर ते आपली शेती पिकवितात. निसर्गाच्या सानिध्यात असलेली आदिवासी गाव आणि सुटसुटीत मोकळया जागेत उभारलेली कुडाची साधी घरं गावरस्त्याच्या दोनी बाजूने एका रांगेने असतात. धोतर, कुर्ता आणि डोक्यावर पागोटं असा पुरुषांचा पोषाख असतो. स्त्रीया साडया परिधान करतात.

**“कोरकू” वर्षभरात विविध सण-उत्सव साजरे करत असले तरी होळी हा त्यांचा सर्वात आवडीचा आणि पारंपारिक महत्वाचा सण आहे. कामधंद्यासाठी बाहेरगावी गेलेली मंडळी या सणानिमित्त आपआपल्या गावी परत येतात. होळी सणाची तयारी कोरकु खूप दिवस अगोदर सुरु करतात. नवनी कपडे, दागदागिने खरेदी केली जातात. घराची साफसफाई करुन सडासंमार्जन करुन घरं सजविली जातात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे नृत्य करण्यासाठी आवश्यक ढोल,ताशे,टिमकी, बासरी इ.साहित्य साफसुधरी केली जातात.

**होळीचा हा पाच दिवसाचा सण निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून “भिमला” नावाचा उपासना विधी साजरा केला जातो. गावातली जाणती ज्येष्ठ मंडळी जंगलात जाऊन टेंभूर्णीच्या झाडाची पूजा करतात. या झाडाची फांदी तोडून ते गावात आणतात. ज्या स्थानावर होळी रचावयाची असते तेथे ही फांदी जमिनीत गाडतात. त्यानंतर त्याभोवती होळी रचली जाते. त्यात पाच बांबू रोवून त्यांच्या टोकावर पळसाची फुलं ,केसा,डहाळया,पु-या, चपाती आदी सामग्री बांधतात. यालाच होळीचा शृंगार मानला जातो. बांबूभोवती तुराटया, पराटया आणि लाकडं व्यवस्थित रचली जातात.

**“मुठवा” हा कोरकूंच्या गावाचा देव आहे. संध्याकाळी गावातले आबालवृध्द स्त्री-पुरुष या देवाजवळ जमा होतात. परंपरागत “फगनय नृत्य” करत ते मिरवणुकीनं गाव पाटलाच्या घरी जातात. पाटलाची बायको या मिरवणुकीला गुलाल लावून ओवाळते. तेथून ही मिरवणुक वाजत गाजत मुठवा देवाजवळ येते. पाटलाची बायको देवाजी पूजा करते. वाटेवरच्या इतर देवतांची पूजा करण्यात येते. मिरवणुकीतले लोक एकमेकांना गुलाल लावत प्रेमाने भेटतात. आदिवासींचा रानमेवा म्हणून ओळखल्या जाणा-या मोहापासून काढलेलं “सिड्डू” हे मद्य प्राशन करतात. मग ही मिरवणूक होळीच्या ठिकाणी जाते. यावेळी आदिवासी स्त्री-पुरुष मिळून हातात हात घालून सामुहिक नृत्य करतात. स्त्रीया गळयात सळी,कर्णभूषणं,हातात पाटल्या,कमरीवर करगोटा आणि पायात तोडे घालून नृत्य करत असतात. गावच्या पाटलाची बायको होळीची पूजा करते आणि होळी पेटविल्या जाते. होळी पेटल्यावर बांबू जळून खाली पडणं अशुभ मानतात. म्हणूनकाही लोक बांबू आपल्या खांद्यावर झेलतात. बांबूचे पाच तुकडे करुन ते परत होळीत टाकतात.

**होळी संपूर्ण पेटल्यानंतर कोरकू मुठवा देवाजवळ एकत्र जमतात. आडवा दोर धरुन स्त्रीया पुरुषांना अडवून “फगवा” मागतात. फगवा मिळाल्याशिवाय रस्ता सोडत नाहीत. याही वेळी स्त्री-पुरुष विशिष्ट प्रकारची गीतं गात नृत्य करत असतात. याला “होरयार नृत्य” असं म्हणतात. त्यानंतर पुरुष मंडळी एका भांडयात पैसे टाकतात. यालाच “फगवा” असं म्हणतात. त्यानंतर पुरुषांना जायला रस्ता दिला जातो. गावपाटलाच्या भेटीला हे सर्व लोक जातात. भोजनानंतर मुठवा देवाजवळ रात्रभर नृत्य सुरु करतात.

**निसर्गपूजक आणि पर्यावरण रक्षक कोरकु आदिवासी, पळसाच्या झाडांच्या फुलांपासून रंगपंचमीस रंग तयार करतात. भांडयात फगवा टाकल्याशिवाय रंग लावायला परवानगी नसते. फगवा टाकल्यावरच रंग पंचमीला खरी सुरुवात होते. इथंही लोक नृत्य करतात.कोरकू आदिवासी स्वत:ला रावणवंशी मानतात. रावणाचा मुलगा “मेघनाथ” हा सर्व देवतांना जिंकणारा महापराक्रमी देव असं कोरकू मानतात आणि म्हणूनच होळीच्या दुस-या दिवशी खांबाची म्हणजेच पर्यायानं मेघनाथची पूजा ते करतात. त्याला नवसाचं कोंबडं बळी देतात. बळी देण्यापूर्वी त्या कोंबडयाचीही पूजा होते. कोंबडयावर पाणी शिंपडल्यावर ते फडफडलं की नवस कबूल केला असं म्हणतात.

**अशा त-हेनं सातपुडा पर्वतराजीच्या मेळघाटातला कोरकू आदिवासी आपल्या परंपरागत पध्दतीनं होळीचा हा सण साजरा करतात. पंचमीच्या दिवशी होलिकोत्सवाची सांगता होते. या दिवशी मद्यप्राशन करणं पवित्र समजलं जातं. शिशिर ऋतुच्या पानगळीत होळीचा अनोखा रंगोत्सव मेळघाटातील आदिवासी कोरकुंच्या आयुष्यातही आनंदाचे रंग भरत असतो ते ऋतूराज वसंतच्या स्वागतासाठी.!!!!!!

Tuesday, March 6, 2012

सी. डी. देशमुख

**चिंतामण द्वारकानाथ देशमुख ऊर्फ सीडी ही एक असामान्य बुद्धिमत्ता असलेली महान व्यक्ती होती. १४ जानेवारी १८९६ साली रायगड जिह्यातल्या नाटा या गावी सीडींचा जन्म झाला. त्यांचे वडील द्वारकानाथ देशमुख मोठे नावाजलेले वकील होते. आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत सीडींनी कधीही पहिला नंबर सोडला नाही. मुंबई विद्यापीठाच्या मॉट्रिकच्या परीक्षेत ते पहिले आले. जगन्नाथ शंकरशेट संस्कृत शिष्यवृत्ती परीक्षेत ते पहिले आले. पुढे केंब्रीज विद्यापीठातून त्यांनी विज्ञानाची पदवी घेतली, तिथे ते पहिले आले आणि आय.सी.एस. (इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस) या परीक्षेतही ते पहिले आले.

**अशा असामान्य बुद्धिमत्तेचा ब्रिटिशांनी योग्य वापर करून घेतला नसता तरच नवल. सन १९२० मध्ये म्हणजे वयाच्या २४व्या वर्षी ते आय.सी.एस. झाले. त्यांच्या करिअरची सुरुवात `सी. पी. बेरार स्टेट' (त्या काळी मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांचे मिळून असलेले राज्य)चे उपायुक्त म्हणून झाली. भराभर पायर्या चढत १९३९ साली ते सेक्रेटरी पदापर्यंत पोहोचले. याच साली रिझर्व बँकेत लाएसन ऑफिसर म्हणून त्यांची नेमणूक झाली. बँकेतील घडामोडींकडे लक्ष ठेवून त्या घडामोडींबाबत सरकारला माहिती देण्याचं महत्त्वाचं काम त्यांच्यावर सोपविण्यात आलं. पुढे रिझर्व बँकेचे सेक्रेटरी, डेप्युटी गव्हर्नर आणि मग १९४३ साली ते भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर झाले. रिझर्व बँकेचे गव्हर्नर बनणारे ते पहिले भारतीय होते. पुढे सहा वर्ष ते गव्हर्नर पदावर राहिले. तेथे त्यांनी स्वत:ची छाप सोडली. ते रिझर्व बँकेचे अत्यंत यशस्वी गव्हर्नर ठरले. रिझर्व बँकेच्या कारभारात त्यांनी असंख्य सुधारणा केल्या. अनेक पद्धतींमध्ये सुयोग्य बदल केले. बँकेच्या वार्षिक अहवालात भारताचं संपूर्ण वर्षाचं वित्तीय चित्र सादर करण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. मुख्य म्हणजे मोठय़ा उद्योगधंद्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी `इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'ची स्थापना त्यांच्याच देखरेखीखाली करण्यात आली. देशात पहिल्यांदाच ग्रामीण भागातील शेतकर्यांना कर्ज देण्याची सुविधा त्यांनी सुरू केली. देशातील कृषी उद्योगाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरली. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेचा आदर राखून ब्रिटिश सरकारनं १९४४ मध्ये त्यांना `सर' ही पदवी बहाल केली.

**रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून त्यांची नेमणूक झाल्यावर अजून एक महत्त्वाची गोष्ट घडली. ब्रिटिश काळातील भारतीय चलनी नोटांवर सी. डी. देशमुखांची सही छापण्यास सुरुवात झाली. चलनी नोटांवर सही करणारे सीडी हे पहिले भारतीय ठरले.

**पुढे त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताचं प्रतिनिधित्व केलं. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड (आय.एम.एफ.) येथेही त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यांनी आय.एम.एफ.च्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचं अध्यक्षपदही भूषविलं.

**याच दरम्यान देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टीनं पाऊलं उचलली जात होती. भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण देशाला अत्यंत दुर्देवी अशा फाळणीला सामोरं जावं लागलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालमत्तेचं वाटप आणि देशावर असलेल्या कर्ज आणि इतर बोजा यांची विभागणी हे एक अत्यंत नाजूक काम होतं. ते काम सीडींच्या देखरेखीखाली पार पडलं.

**१ जानेवारी १९४९ साली रिझर्व बँकेचं जे राष्ट्रीयीकरण झालं त्याचीही महत्त्वाची जबाबदारी सीडींवर होती. भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी सीडींना या योजनेत सामील करून घेतलं. भारताचा आर्थिक पाया मजबूत करण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं. दुसर्या पंचवार्षिक योजनेचा आराखडाही त्यांनी तयार केला. लगेचच ते नेहरूंच्या केंद्रीय मंत्रीमंडळात वित्तमंत्री म्हणून रुजू झाले. भारतासारख्या विकसनशील देशाचा जलद आर्थिक विकास व्हावा, समाजाला आर्थिकदृष्टय़ा न्याय मिळावा आणि देशाला आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावं, या दृष्टीनं ते सतत प्रयत्नशील राहिले. नवीन कंपनी कायदा, स्टेट बँका आणि आयुर्विमा कंपन्यांचं राष्ट्रीयीकरण यामध्येही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

**१९५६ सालापर्यंत ते नेहरूंच्या मंत्रीमंडळात वित्तमंत्री राहिले. आणि मग मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला पाठिंबा देण्याच्या हेतूनं त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

**अर्थात, त्यानंतरही त्यांची लोकसेवा आणि देशसेवा सुरूच राहिली. १९५६ ते १९६० दरम्यान त्यांनी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचं अध्यक्षपद भूषविलं. भारतातील सर्व विद्यापीठांच्या दरम्यान समन्वय साधणं आणि विद्यापीठांचा दर्जा वाढविणं हे या कमिशनचं मुख्य काम होतं. १९६२ ते १९६७ दरम्यान ते दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू होते. खरं तर या काळापर्यंत ते जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ झालेले होते. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आर्थिक सल्लागार त्यांची नेमणूक करायला तयार होत्या. तेथे त्यांना गलेलठ्ठ पगारही मिळाला असता. एवढंच नव्हे, तर आय.एम.एफ.चे मॅनेजिंग डायरेक्टर होण्याचं निमंत्रणही त्यांना आलं होतं. पण ते नाकारून त्यांनी भारतातच राहण्याचं ठरवलं.

**सी. डी. देशमुखांचं व्यक्तिमत्त्व हरहुन्नरी होतं. खरं तर ते विज्ञानाचे पदवीधर. पण नंतर ते अर्थकारणात शिरले. त्यांना जगातील सात भाषा उत्तमरित्या अवगत होत्या. ते बॅडमिंटनही चांगलं खेळायचे. रोज सकाळचा वेळी ते बागकाम करायचे. तत्त्वज्ञान हाही त्यांचा आवडीचा विषय होता. संस्कृत भाषेचे तर ते पंडितच होते. १९६९ साली त्यांच्या संस्कृत कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. केंद्र सरकारचे वित्तीय अंदाजपत्रक सादर करताना त्यांच्या भाषणामध्ये ते संस्कृत सुभाषितांची छान पेरणी करायचे. विरोधी पक्षाच्या प्रश्नाला उत्तर देण्याची त्यांची शैली अत्यंत विनम्र होती. आपला मुद्दा, आपले विचार स्पष्टपणे मांडण्यात ते वाक्बगार होते. त्यांचं वक्तृत्वही उत्तम होतं. सीडींच्या वक्तृत्वगुणाची आठवण म्हणून भारतीय रिझर्व बँकेनं १९८५ सालापासून `सी. डी. देशमुख स्मृती व्याख्यानमाला' सुरू केली.

**त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेची आणि त्यांनी केलेल्या देशसेवेची सर्व थरांतून चांगली दखल घेतली गेली. त्यांना अक्षरश: असंख्य देशी-विदेशी सन्मान प्राप्त झाले. आर्थिक क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असामान्य कामगिरी केल्याबद्दल १९५९ साली त्यांना फिलिपिन्सच्या जोस ऍग्विलर यांना संयुक्तपणे शासकीय सेवा या क्षेत्रातला मॅगेसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला. १९७५ साली त्यांना पद्मविभूषण या पदवीनं गौरविण्यात आलं.

सी. डी. देशमुखांनी आपल्या व्यस्त जीवनशैलीमधून वेळ काढून स्वत:चं आरोग्यही उत्तम राखलं होतं. त्यामुळे त्यांना दीर्यायुष्य लाभलं. वयाच्या ८७ व्या वर्षी म्हणजे १९८२ साली हैदराबाद येथे त्यांचं निधन झालं