स्वा. सावरकरांच्या काव्याचे क्रांतीकार्य !
स्वा. सावरकरांनी खङ्गासारख्या धारदार आणि लखलखीत लेखणीrद्वारे राष्ट्राला भव्योदात्त आणि स्फूर्तीदायी साहित्य देणे ‘मृत्युंजय स्वा. सावरकर यांची वाणी आणि लेखणी खड्गासारखीच धारदार आणि लखलखीत होती. त्यांनी जे ज्वलंत साहित्य उभ्या राष्ट्राला दिले, ते आकाराने जेवढे भव्योदात्त तेवढेच गुणवत्तेमध्येही कांतीमान, स्फूर्तीदायी अन् चिरंजिवी ठरले आहे.जयोऽस्तुते श्री महन्मंगले, शिवास्पदे शुभदे ।
स्वतंत्रते भगवति, त्वामहं यशोयुत्वां वंदे ।।
अर्थ : हे महान मंगलदायक, शिवाच्या चरणांजवळ रहाणार्या, शुभफल देणार्या, स्वतंत्रता देणार्या श्री भगवतीदेवी तुझा विजय असो ! यश देणार्या देवी, तुला मी वंदन करतो.
पुण्यामध्ये १९३० साली सावरकरांनी स्वतंत्रतेचे हे स्तोत्र रचले. अद्यापही या स्तोत्राची जादू अजून कायम आहे आणि यापुढेही राहील.’ (‘स्वातंत्र्यवीर’, जन्मोत्सव विशेषांक २००८, पृष्ठ २०)
स्वा. सावरकरांचे साहित्यवाङ्मय चिरकाल टिकून रहाणारे असून दीपस्तंभाप्रमाणे भावी पिढ्या आणि देश यांना प्रकाश देणार असणे
‘कल्पनेच्या विहारातही स्वा. सावरकरांना वास्तवाचे विस्मरण झालेले नाही. त्यांच्या प्रतिभेचा एक पंख आकाशात विहार करणार्या काव्यमय कल्पनाशक्तीचा होता, तर दुसरा पंख भूतलावर संचार करणार्या वास्तववादी चिकित्सकबुद्धीचा होता. साहित्याच्या द्वारे स्वमत प्रचार करण्याचे जे अनन्यसाधारण सामर्थ्य नि कौशल्य स्वा. सावरकरांच्या लेखणीत होते, ते इतर कोणाही भारतीय लेखकात असल्याचे आढळत नाही.
त्यांच्याप्रमाणे दुसर्या कोणत्याही लेखकाने महाराष्ट्रात एवढी प्रचंड खळबळ उडवून दिली नाही किंवा इतके प्रक्षुब्ध विचारमंथन घडवून आणले नाही. स्वा. सावरकरांनी अकरा हजार पृष्ठांचे साहित्य लेखन केले. वाङ्मयातले सर्व साहित्यप्रकार हाताळले. स्वा. सावरकरांचे साहित्यवाङ्मय चिरकाल टिकून रहाणारे आहे. एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे त्यांचे साहित्य भावी पिढ्या आणि देश यांना प्रकाश देत राहील. हा चिरंतन साहित्यिक भावी भारताला नवी स्फूर्ती नि नवे धैर्य अखंड पुरवत राहील, यात शंका नाही.’ - शंकर दत्तात्रय गोखले (‘स्वातंत्र्यवीर जन्मोत्सव विशेषांक २००८’, पृष्ठ क्र. २६)
हे मातृभूमी ! तुजला मन वाहियेले ।
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले ।
तुतेची अर्पिली नवी कविता रसाला ।
लेखाप्रती विषय तूची अनन्य झाला ।।
- स्वातंत्र्यवीर सावरकर, १९१०
मराठीतील ‘स्वातंत्र्य-सूक्ते’ निर्माण करणारे सावरकर !
‘स्वा. सावरकरांचे साहित्य म्हणजे मराठी साहित्यातील ‘स्वातंत्र्य सूक्ते’ आहेत. ज्या रमणीय उषःकाली क्रांतदर्शी मंत्रद्रष्ट्या वैदिक ऋषींना वेदांतील सूक्ते सुचली, तशाच एका रमणीय पावनक्षणी सावरकरांना ही ‘स्वातंत्र्य-सूक्ते’ स्फुरली असतील. स्वा. सावरकरांचे साहित्य म्हणजे मराठी वाङ्मयातील पुरुषसूक्त आहे.’ (‘स्वातंत्र्यवीर’, जन्मोत्सव विशेषांक २००८, पृष्ठ २२)
ज्वालाग्राही कवितांच्या बळावर स्वातंत्र्यलढ्याचा अग्नीकुंड धगधगता ठेवणारे सावरकर !
‘प्रत्येक थोर व्यक्तीच्या मागे काहीतरी प्रेरणा असते. त्याशिवाय त्या व्यक्तीच्या हातून भरीव कार्य होतच नाही. ‘स्वातंत्र्यवीर’ सावरकरांच्या मागे ‘कवीवर्य सावरकर’ भक्कम उभे होते. त्यांची ज्वालाग्राही कविताच त्यांना प्रत्येक कार्यात प्रेरणा देत होती. आयुष्यभर त्यांना कवितेने खर्या अर्थाने आधार दिला. कवितेच्या आधारावर त्यांनी स्वातंत्र्यलढ्याचा अग्नीकुंड धगधगता ठेवला.’ (‘स्वातंत्र्यवीर’, जन्मोत्सव विशेषांक २००८, पृष्ठ २१)
साहित्याद्वारे हुतात्म्यांच्या अनेक मालिका पोसणारे सावरकर !
‘लेखणी’ आणि ‘वाणी’ या उभय शक्ती केवळ देशासाठी ज्याने अखंड वाहून टाकल्या होत्या, असा सावरकरांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही साहित्यिक भारतात आढळून येत नाही. त्यांचे वाङ्मय वाचकांच्या अंतःकरणात नवीन आशा फुलवणारे नि नवे धैर्य निर्माण करणारे आहे. देशभक्ताला स्फूर्ती देणारे, तत्त्वमीमांसकाला विचार करायला लावणारे आणि स्वातंत्र्य नि जनहित यांच्यासाठी शूराला धर्मयुद्धाला प्रवृत्त करणारे असे त्यांच्या वाङ्मयाचे सामर्थ्य आहे. त्यांचीच एक लेखणी अशी होती की, जिथे हुतात्म्यांची मालिकांची मालिका स्वतःच्या दुधावर पोसली होती. इतिहासातील ही अभूतपूर्व आणि अजोड घटना आहे.’ - शंकर दत्तात्रेय गोखले (‘स्वातंत्र्यवीर’, जन्मोत्सव विशेषांक २००८, पृष्ठ २६)
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेले गीत स्वातंत्र्यानंतर १६ वर्षांनी आकाशवाणीवरून लावणारी सावरकरद्वेष्टी काँग्रेस ! : ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘जयोऽस्तुते श्री महन्मंगले.....,’ हे अजरामर गीत आकाशवाणीवर लागायला स्वातंत्र्यानंतर १६ वर्षे जावी लागली. हे एकच गीत लिहून स्वातंत्र्यवीर सावरकर थांबले असते, तरी राष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतले असते; पण गीतकाराच्या द्वेषामुळे त्या गीताचीच महती काँग्रेसने गुंडाळून ठेवली.’ - श्री. संजय दिगंबर मुळ्ये, रत्नागिरी (दैनिक सनातन प्रभात, ३०.१०.२००६)
सांगली येथे झालेल्या ८१ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात स्वा. सावरकरांच्या विचारधारेला नगण्य स्थान देण्यात आले. ज्या माणसांची स्वा. सावरकरांच्या पायापाशी बसण्याची पात्रता नाही, त्यांना या संमेलनात मानाचे स्थान देण्यात आले.
भाषाशुद्धी
स्वा. सावरकरांनी केलेल्या भाषाशुद्धीचे महत्त्व
स्वा. सावरकरांनी भाषाशुद्धी केली नसती, तर एव्हाना मराठीमध्ये उर्दूमधील २० टक्के आणि इंग्रजीतील ३० टक्के शब्द प्रचलित झाले असते अन् मराठीचे मराठीपण संपले असते. मराठी भाषेचे अशुद्धीकरण सुरूच राहिले असते, तर हल्ली ज्ञानेश्वरीतील मराठी कळत नाही, तशी १०० वर्षांनी हल्लीची मराठी कळली नसती. संस्कृतची जी स्थिती स्वातंत्र्योत्तर काळात झाली, तशी स्थिती मराठीचीही झाली असती.
स्वा. सावरकरांचा भाषाशुद्धी-शब्दकोश
सावरकरांनी अनेक परकीय शब्दांना मराठी प्रतिशब्द योजले. हे शब्द शोधतांना त्यांनी मराठीचे मराठीपण आणि नित्याच्या भाषेचे सोपेपण नष्ट होणार नाही, याची दक्षता घेतली. परकीय शब्दांना सावरकरांनी स्वतः नवीन पाडलेले आणि जुनेच पण नव्याने प्रचारात आणलेले असे अनेक शब्द त्यांच्या ‘भाषाशुद्धी’ या ग्रंथाच्या शेवटी ‘भाषाशुद्धी-शब्दकोश’ या मथळ्याखाली देण्यात आले आहेत.
स्वकीय शब्द नामशेष करून विदेशी शब्द बोकाळू देणे, म्हणजे औरस मुलांची कत्तल करून मुलगा दत्तक घेणे
आपले तदर्थक जुने उत्तम शब्द असतांनाही किंवा नवीन स्वकीय शब्द उद्भावन करणे शक्य असतांनाही त्या जुन्या शब्दांस लुप्त करून टाकणार्या किंवा त्या नव्यांची नाकेबंदी करणार्या आणि म्हणूनच अगदी अनावश्यक असणार्या विदेशी शब्दांस, मग ते उर्दू असोत वा इंग्लिश असोत वा इतर कोणतेही असोत, स्वभाषेत, निष्कारण वावरू देऊ नये. आपला स्वकीय शब्द नामशेष करून विदेशी बोकाळू देणे, हा काही शब्दसंपत्ती वाढवण्याचा मार्ग नव्हे आणि औरस मुलांची कत्तल करून मुलगा दत्तक घेत सुटणे, हा काही वंशविस्ताराचा मार्ग नव्हे.