Tuesday, March 6, 2012

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

**भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी त्यांची श्रद्धा व विचारसरणी होती. त्यांनी समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी अहर्निश काळजी वाहिली, चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपुर कल्पना होती. त्यामुळं त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूत स्वरुपाचा विचार केला व त्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उपकारक ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्याविनंतरच्या काळातही) तीव्रतेनं जाणवतं. यातून राष्ट्रसंतांच द्रष्टेपण व्यक्त झालं आहे.

**अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे त्यांच्या आयुष्यातील जसं लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणं ग्रामगीतेचं लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्वाचा टप्पा. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांची वाङमयीन पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिलं, ही त्यांची श्रद्धा होती. त्यांचं मूळनाव माणिक होतं पण त्यांचं हे नाव त्यांच्या गुरूंनी अडकोजी महाराज यांनीच योजिलं होतं.

**खेडेगाव स्वयंपूर्ण कसं होईल, याविषयीची त्यांनी उपाययोजना सुचविली, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावं, सुसंस्कृत व्हावं, ग्रामोद्योग संपन्न व्हावं, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावं, प्रचारकांच्या रूपानं गावाला नेतृत्व मिळावं, अशीही त्यांची निष्ठा होती. तिचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटलं आहे. देवभोळेपणा, अंधश्रद्धा जुनाट कालबाह्य रूपी नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले.

**सर्वधर्मसमभाव हेही राष्ट्रसंतांच्या विचारविश्वाचं एक वैशिष्ट्यच होतं. त्यासाठी त्या सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.

**एकेश्वरवाद ही त्यांनी विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतूनच पुरस्कारला होता. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला. आयुष्याच्या शेवटच्या काळापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार पुरस्कार करुन आध्यात्मिक , सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी योग्य अशी पार्श्वभूमी निर्माण व्हावी, यासाठी त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधूसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचं हे कार्य अखंडव्रतासारखं चालवीत आहेत.

**महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या किर्तनांद्वारे समाजाला पटवून दिलं. त्यामुळं स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणं कसं अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिलं.

**देशातले तरूण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचं व राष्ट्राचं संरक्षण करु शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचं उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन त्यांनी केलं. व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध राष्ट्रसंतांनी आपल्या लेखनातून केला.

**ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय राष्ट्रसंतांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणंच हिंदी भाषेतही विपुल लेखन केलं. आजही त्यांचं हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरुन त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्यं कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी राष्ट्रसंत म्हणून संबोधिलं होतं

Saturday, March 3, 2012

JAGO GRAHAK JAGO!!!

ग्राहक हिताचे संरक्षण हा वैधमापन शास्त्र यंत्रणेचा मूळ उद्देश असून त्यासाठी या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणा-या व्यापारी आस्थापना आवेष्टक व उत्पादक, आयातदार आवेष्टनाचे काम करणा-या आस्थापना, औद्योगिक संस्था यांना अचानक भेट देऊन वेळच्या वेळी तपासण्या केल्या जातात.

त्यांच्याकडे वापरात ठेवलेली व ताब्यात असलेली वजने, मापे, तोलन व मापन उपकरणे यांची विहित मुदतीत पडताळणी व मुद्रांकनाचे काम केले जाते.तसेच माल कमी देणे, ज्यादा किंमतीने मालाची विक्री करणे, खरेदीच्या वेळी ठरलेल्या मोजमापापेक्षा फसवणुकीने जादा माल घेणे यासारख्या वजनमापे कायद्याअंतर्गत तरतुदीच्या भंगाबद्दल संबंध्‍ितांवर गुन्हे दाखल केले जातात.

ग्राहक या नात्याने, सुज्ञ नागरिकाने आपली फसवणूक होणार नाही यासाठी दक्ष राहिले पाहिजे.वैधमापनशास्त्र, म्हणजे वजन मापाचे शास्त्र.

या यंत्रणेमार्फत पुढील अधिनियम व नियमांची अंमलबजावणी करण्यात येते.

  • वजने व मापे मानके अधिनियम १९७६,
  • वजने मापे मानके (आवेष्टीत वस्तू) नियम १९७७,
  • वजने मापे मानके (अंमलबजावणी) नियम १९८५,
  • महाराष्ट्र वजने मापे मानके (अंमलबजावणी) नियम १९८७.

    प्रत्येक वस्तू मार्केट मध्ये वजने वा मापाने दिली जाते.हे करीत असताना व्यापा-याने वजन बरोबर करुन दिले किंवा कसे ? घेतलेली वस्तू द्रव स्वरुपात असेल तर ती बरोबर दिली किंवा नाही याबाबत या यंत्रणेकडून खातरजमा केली जाते. ही मेट्रीक पध्दत असून ती १९५८ ला लागू झाली. पूर्वी लांबीची मोजणी फूटामध्ये व्हायची मात्र त्यावर कायद्याने बंधन घातले आहे.

    एखादी वस्तू जर पॅकेटस् मध्ये बंद असेल तर त्या पॅकेटवर ६ गोष्टी असणे कायद्याने बंधनकारक आहे.
  • वस्तूच्या मॅन्युफॅक्चरचे नाव पॅकेटवर असायला पाहिजे.
  • त्या पॅकेट मध्ये काय आहे ?
  • वजन किती आहे?,
  • युनिट असेल तर किती युनिटस् आहे ?
  • पॅकेटस् वर निर्मितीचा महिना व वर्ष.
  • अधिकतम विक्री किंमत...(सर्व करासहित)
  • कन्झुमर केअर क्रमांक.

    बाजारात मिळणा-या आयातीत वस्तूंवरदेखील त्यांच्या आयातदाराचे तसेच त्याची पॅकिंग करणा-यांची (इम्पोर्ट व पॅकर) नावे व पत्ते असणे आवश्यक आहे.त्यापैकी एखादीही माहिती वस्तूवर नमूद नसेल तर तो कायद्याने गुन्हा ठरतो आणि आणि गुन्ह्यासाठी कायद्यात शिक्षाही नमूद केली आहे.

    वरील प्रकारचे सर्व गुन्हे हे खात्यामार्फत सामोपचाराने मिटविले जातात.संबधितावर नोंदविलेल्या गुन्ह्यात त्यांनी आरोपाचा इन्कार केल्यास ते गुन्हे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात पाठविला जातो.

    वरील ६ गोष्टी पैकी एखाद्या पॅकेटवर आवश्यक माहिती लिहिली नसल्याचे आढळले तर त्या संदर्भात वैधमापनशास्त्र विभागास तक्रार करायला हवी.

    विभागाच्या नजिकच्या कार्यालयात,दूरध्वनीद्वारे किंवा इमेलव्दारे कोणाताही ग्राहक तक्रार नोंदवू शकतो.

    ग्राहकांचे तक्रारीनुसार किंवा त्यांनी पुरविलेल्या माहितीनुसार विभागाचे निरिक्षक किंवा सहाय्यक नियंत्रक त्या दुकानावर छापा मारु शकतात.