Tuesday, March 6, 2012

जे आर डी टाटा


**पहिले भारतीय वैमानिक, भारताच्या हवाई उद्योगाचे जनक, भारतातील अग्रगण्य उद्योजक, आपल्या कामगारांचे आणि कर्मचार्यांचे हित जपणारा सहृदय उद्योजक... अशा कितीतरी विशेषणांनी जहांगीर रतनजी दादाभॉई उर्फ जे आर डी टाटा यांचे वर्णन करता येईल.

**जेआरडींचा जन्म २९ जुलै १९०४ मध्ये पॅरीस (फ्रांस) येथे झाला. रतनजी दादाभॉय टाटा यांचे ते द्वितीय पुत्र. मुंबईतील कॅथेड्रल ऍण्ड जॉन केन्नॉन स्कूल येथे काही वर्ष ते शिकले, पण जेआरडींची आई फ्रेंच असल्यामुळे त्यांचे बालपण मुख्यत: फ्रांसमध्येच गेले. काही कारणाने ते मॅट्रीकच्या पुढे शिकू शकले नाहीत.

**इंग्लिश खाडी विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणारे सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खूप प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनीही विमान शिकण्याचा ध्यास घेतला. सन १९२९मध्ये त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय होत. लगेचच १९३२ साली त्यांनी `टाटा एअरलाईन्स' या पहिल्या भारतीय प्रवासी विमान वाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे १९४६ साली त्याचे नाव बदलून `एअर इंडिया' केले गेले.
वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी म्हणजे १९३८ साली ते `टाटा सन्स'चे चेअरमन झाले. त्यानंतर ते प्रदीर्घ काळ त्या पदावर विराजमान होते. त्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटा सन्सच्या १४ कंपन्या होत्या. जेआरडींच्या काळात ९१ कंपन्यांची त्यांनी भर टाकली. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांत त्यांनी टाटा समूहाचा विस्तार केला रसायन, वाहन, चहा, माहिती, हॉटेल्स आणि तंत्रज्ञान अशी अनेक नवीन क्षेत्र त्यांनी टाटा समूहासाठी खुली केली. एक एक क्षेत्र पादाक्रांत करीत असताना त्यांनी कोठेही नीतिमत्ता सोडली नाही. सर्व व्यवहार सचोटीने आणि पारदर्शकपणे करण्याकडे त्यांचा कटाक्ष असे.
उद्योग व्यवसायाच्या व्यवस्थापनात कामगारांचे म्हणणेही ऐकले जावे, असे जेआरडींचे मत होते. जेआरडींच्या पुढाकाराने १९५६मध्ये कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली. त्यामध्ये `दिवसातून आठ तास काम', `मोफत आरोग्य सेवा', `भविष्य निर्वाह निधी' आणि `अपघात विमा योजना' अशा पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे ही योजना भारत सरकारने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायद्याने बंधनकारक केली.

**एवढेच नव्हे, तर कामगार किंवा कर्मचारी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर त्याची संपूर्ण जबाबदारी टाटा समूहाने स्वीकारली. त्यामुळे वाटेत जर त्याचे काही बरे-वाईट झाले, तर त्याचीही जबाबदारी कंपनीने स्वीकारायला सुरुवात केली.
जेआरडींच्या कारकिर्दीत उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापन झाल्या. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी १९३६ साली टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस आणि १९४५ साली टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची स्थापना केली. आशियातील पहिले कॅन्सर हॉस्पिटल १९४१ साली मुंबईत सुरू केले.

**जेआरडींना अनेक पारितोषिके मिळाली. भारत सरकारतर्फे त्यांना १९५७ साली `पद्मविभूषण'नी सन्मानित करण्यात आले, तर १९९२ साली त्यांना `भारतरत्न' हा सर्वोच्च भारतीय सन्मान बहाल करण्यात आला. वयाच्या ८९व्या वर्षी, २९ नोव्हेंबर १९९३ साली जिनेव्हा (स्विट्झरलंड) येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

संत गाडगेबाबा


**गाडगेबाबा यांचं जन्मगाव अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव. ते परीट समाजातले होते, हे मुद्दाम सांगावं लागतं कारण त्यांनी कधीच जातिभेद मान्य केला नाही, त्यामुळं ते अमुक समाजातले होते, असं कसं म्हणता येईल?त्यांचं आडनाव जानोरकर असं होतं. त्यांच्या वडिलांचं नाव झिंगराजी नि आईचं सखुबाई.

**लहानपणापासूनच त्यांना डेबू किंवा डेबूजी म्हणत. घरची परिस्थिती, त्यामुळं मामाची गुरं सांभाळणं नि शेतीची कामं करण्यातच त्यांच्या आयुष्याचा सुरुवातीचा काळ गेला. अशा बिकट परिस्थितीत शिक्षण तरी कसं घेता येणार ? मात्र, कष्टाळू प्रवृत्तीमुळं ते शेतीची कामंही अत्यंत चांगल्याप्रकारे करू लागले. शेतकरी- कामकरी यांना किती कष्ट नि परिश्रम करावे लागतात नि किती हाल अपेष्टांना तोंड द्यावं लागतं, याचीही कल्पना त्यांना येत गेली. श्रमप्रतिष्ठेचं महत्त्व त्यांना कळलं जनसामान्यांच्या वास्तव समस्या नि दु:खं त्यांना तीव्रतेनं जाणवली. समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाकाजी, धर्माविषयीच्या चुकीच्या कल्पना यांच्या विरोधात समाजजागरण करायला हवं, याचीही त्यांना जाणीव होऊ लागली. अशाप्रकारे त्यांच्या विचारांची जडणघडण बालपणापासूनच होत गेली. समाजजीवनाचं सूक्ष्म निरीक्षण समाजाला योग्य शिकवण देऊन चांगल्या, सुसंस्कृत, बुद्धिवादी, विवेकनिष्ठ, सुसंस्कारयुक्त समाजाचं नवनिर्माण करण्याची आवश्यकताही त्यांना तीव्रतेनं भासली. यासाठी केवळ बघ्याची भूमिका घेऊन स्वस्थ बसणं गाडगेबाबांसारख्या सत्पुरुषाला आवडणं शक्यचं नव्हतं.

**समाजातील दारिद्र्य नि जातिभेदांमुळं निर्माण होणारी विषयता, त्याचप्रमाणं देवभोळेपणा हेच समाजाच्या कल्याणातले प्रगतीतले अडसर आहेत. ते काढून टाकायला हवेत, या त्यांच्या मनातील विचार-बीजालाच पुढं अंकुर फुटले नि त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून या कार्यास प्रारंभ केला. देव दगडात नसून माणसात असतो, यासाठीच माणूस घडविणं, हेच आपलं ब्रीद असायला हवं, त्यासाठी शिक्षण घ्यायला हवं, या मताचा पुनरुच्चार त्यांनी वेळोवेळी केला. ज्या दलितांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही त्यांच्या शाळांसाठी आपल्या जागा दिल्या. जागोजागी गरीबांसाठी धर्मशाळा बांधल्या. कीर्तनाच्या प्रभावी माध्यमातून देव दगडात नसतो तर तो माणसात असतो, त्या माणसाचीच आपण सेवा करायला हवी या बुद्धिप्रामाण्यवादी विचाराचे सुसंस्कार गाडगेबाबांनी सर्वसामान्यांवर केले.

देवकीनंदन गोपाला, गोपाला हे त्यांच्या भजनाचं जणू ध्रुपदच होतं.

**बाबा स्वत: तुकड्या तुकड्यांनी शिवलेली गोधडीची वस्त्रं नेसत. आज सामान्य माणसाला, मजूरांना, शेतकर्यांना धड अंगभर नेसायला मिळत नाहीत, मग आपणही त्यांच्यासारखंच राहायला नको का? हा विचार यामागं असावा. महाराष्ट्रातील धर्मविचार नितळ, निकोप, निष्कलंक, निरपेक्ष, शुचिर्भूत करण्यासाठी बाबांनी उभी हयात वेचली. नव्या विचारांचं स्वागत नि पूर्वीच्या अनिष्ट प्रथांना निरोप हा त्यांच्या विचारसरणीचा केंद्रबिंदू होता, गाभा होता. त्यांनी समाजातील व्यसनाधिनतेवर कठोर प्रहार केले. धर्माचं अत्यंत नितळ मूळ रूप त्यांनी समाजासमोर ठेवलं. जुन्या वाईट प्रथा, रुढी यांना प्रखर विरोध केला. धर्माचं नितळ रुप समाजा समोर ठेवलं ग्रामस्वच्छतेसाठी जागोगाग प्रसार केला. त्यांच्याबद्दल त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं अमरावती विद्यापीठाला त्यांचं नाव दिलं त्यांच्या नावानं ग्रामस्वच्छता पुरस्कार देण्याची योजनाही कार्यान्वित केली आहे.

जयंत विष्णू नारळीकर


**आपल्या देशात गणित तज्ञांची आणि खगोल वैज्ञानिकांची मोठी परंपरा आहे. आर्यभट्टपासून चालत आलेली ही परंपरा आजही पुढे चालू ठेवली आहे ती डॉ. जयंत नारळीकरांसारख्या थोर खगोल शास्त्रज्ञांनी. डॉ. नारळीकर एक जगद्विख्यात शास्त्रज्ञ तर आहेतच पण ते उत्तम साहित्यिकही आहेत. कारण खगोल शास्त्रात महान संशोधन करण्याबरोबरच त्यांनी मराठी-हिंदी साहित्यांत विज्ञान साहित्याची मोलाची भर टाकली आहे.

**डॉ. नारळीकरांचे संपूर्ण नाव जयंत विष्णू नारळीकर. त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. गणिताचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला. त्याचे वडील, विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणित तज्ञ होते. वाराणशी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रमुख होते. डॉ. नारळीकरांचं संस्कृतवरही प्रभुत्व आहे. तो वारसा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाला. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या.

**डॉ. नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणशी येथे झाले. तेथूनच सन १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रीज विद्यापीठात गेले. तेथे त्यांना बी.. एम.. आणि पी.एचडी.च्या पदव्या मिळाल्या. त्या काळात त्यांना रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल इतर अनेक बक्षिसे मिळाली.

**त्यांनी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर फ्रेड हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एचडी. केली. सर फ्रेड हॉईल डॉ. नारळीकरांच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झाले. त्यामुळे १९६६ जेव्हा हॉईड यांनी केंब्रीज येथे `इन्स्टिटय़ूट ऑफ थिऑरॉटीकल ऍस्ट्रॉनॉमी' नावाची जी स्वत:ची संस्था सुरू केली, त्यात डॉ. नारळीकरांचाही महत्त्वाचा वाटा होता. १९६६ ते १९७२पर्यंत ते या संस्थेशी निगडीत होते. सर हॉईल आणि डॉ. नारळीकर यांनी खगोल शास्त्रात एकत्र संशोधन केलं. गुरुत्वाकर्षणावर त्या दोघांनी मिळून संशोधन करून जो सिद्धांत मांडला, तो `हॉईल-नारळीकर सिद्धांत' या नावाने खगोलशास्त्रात प्रसिद्ध आहे. अर्ल्बर्ट आईन्स्टाईनच्या साक्षेपतेच्या सिद्धांताशी साधर्म्य साधणारा असा हा सिद्धांत आहे. हा सिद्धांत असे सांगतो की, वस्तूमधील कणाचे अंतर्गत वस्तुमान हे त्या वस्तूतील सर्व कणांच्या एकत्रित कार्याची परिणती असते.

**दरम्यान डॉ. नारळीकरांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिराव राजवाडे यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा लिलावती.

**आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवल्यानंतर भारतातील खगोल शास्त्रातील संशोधनाला आणि लोकप्रियतेला गती देण्यासाठी १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून पद स्वीकारले. कालांतराने १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्त झाली.

**डॉ. नारळीकर शास्त्रज्ञ म्हणून ख्यातनाम तर आहेतच, पण त्याच बरोबर मराठी साहित्यात त्यांनी फार मोलाची भर घातली. विज्ञानकथांना त्यांनी मराठीत चालना देण्याचं महत्त्वाचं काम केलं. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी अनेक लेख आणि कथा लिहिल्या. यासाठी सर्व प्रसार माध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या `यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

**त्यांनी लिहिलेल्या `वामन परत आला', `अंतराळातील भस्मासुर', `कृष्णमेघ', `प्रेषित', `व्हायरस', `यक्षाची देणगी', `टाईम मशीनची किमया', `याला जीवन ऐसे नाव' हे कथासंग्रह अत्यंत लोकप्रिय ठरले. शिवाय `आकाशाशी जडले नाते', `विमानाची गरुडझेप', `गणितातील गमतीजमती', `विश्वाची रचना', `विज्ञानाचे रचयिते', `नभात हसरे तारे' ही विज्ञानातील माहितीपर पुस्तके म्हणजे मराठीतला जपून ठेवावा आणि नेहमी काढून वाचावा असा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
 
**मराठीच नव्हे, तर भारतातील सर्व भाषांतील गणित आणि विज्ञानातील पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम काटेकोरपणे रचण्याचे कामही ते करीत आहेत.
 
**त्यांच्या महान कार्याची दखल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली. त्यामुळे त्यांना अनेक मान-सन्मान प्राप्त झाले. १९६५ साली त्यांना पद्मभूषण तर २००४ साली पद्मविभूषणने सन्मानीत करण्यात आले. शिवाय डॉ. भटनागर स्मृती पारितोषिक, एम.पी. बिरला सन्मान आणि फ्रेंच ऍस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचा पिक्स ज्यूल्स जेन्सनसारखे सन्मानही त्यांना प्राप्त झाले. लंडनच्या रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे ते सहाधिकारी आहेत, तर इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस चे ते अधिछात्र आहेत. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीच्या इंदिरा गांधी पारितोषिकानेही त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे. वैज्ञानिक विषयांत साहित्यिक लिखाण करून विज्ञानाचा प्रसार करण्यासाठीही त्यांना १९९६ साली युनेस्कोने कलिंग पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला आहे.
आजही पुण्यातील `आयुका'च्या माध्यमाने ते संशोधन कार्यात मठ आहेत. आज चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे अंतरिक्ष विज्ञान क्षेत्रात संशोधन सुरू आहे.