Tuesday, March 23, 2010



 
होमी भाभा: भविष्यवेधी मार्गदर्शक

त्यांना चव्वेचाळीस वर्षांपूर्वी, 24 जानेवारीला अपघाती मृत्यू आला!
काही व्यक्ती द्रष्टया व भविष्यवेधी असतात, परंतु त्यांना त्यांच्या दूरदृष्टीतील विश्व प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी लागणारे कोणतेही पाठबळ मिळत नाही. या उलट, सत्तापदी बसलेल्या कित्येक व्यक्तींची दृष्टी संकुचित असते. जर एखाद्या बहुगुणी व्यक्तीच्या कर्तृत्वाला योग्य पाठबळ मिळाले तर तो समाज व देश हे सुदैवी असतात असेच म्हटले पाहिजे. सधन पारशी कुटुंबात 1909 साली जन्मलेले डॉ. होमी जहांगीर भाभा हे एक असे द्रष्टे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी  पंडित जवाहरलाल नेहरूंचा विश्वास संपादन केल्याने दोन द्रष्टया व्यक्तींची परस्परपूरक शक्ती निर्माण झाली. या एका बाबीचा भारताच्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये मोठा वाटा आहे!
डॉ. भाभा अभियांत्रिकीच्या अभ्यासासाठी केंब्रिज विद्यापीठात असताना, तेथील संशोधनासाठी पोषक असलेल्या वातावरणाने प्रभावित झाले. आयुष्यात आपल्याला काय बनायचे आहे याची नेमकी कल्पना, त्यांना वयाच्या विशीच्या आतच आली. त्यांनी आपल्या वडिलांना 8 ऑगस्ट 1928 रोजी लिहिलेल्या प्रसिध्द पत्रात ते म्हणतात, '' एखादा व्यवसाय करणे अथवा अभियंता म्हणून नोकरी करणे हे माझ्या स्वभावात बसत नाही, ते माझ्या वृत्तीच्या व मतांच्या थेट विरुध्द आहे. भौतिकशास्त्र हे माझे क्षेत्र आहे व त्यात  काम करण्याची माझी ज्वलंत इच्छा आहे. एखाद्या संस्थेचा प्रमुख किंवा 'यशस्वी' माणूस होण्याची माझी इच्छा नाही. ते करण्यासाठी अनेक हुशार व्यक्ती आहेत. मला भौतिकशास्त्रामध्ये काम करू देण्याची मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो.''
त्यांच्या वडिलांना हे फारसे पटले नाही. पण त्यांनी भाभांना अभियांत्रिकीत प्रथम श्रेणी मिळाल्यास पुढील दोन वर्षे गणिताच्या अभ्यासासाठी केंब्रिजमधील वास्तव्याच्या परवानगीचे वचन दिले आणि पुढे तसेच घडले. त्यानंतर, वयाच्या तिशीपर्यंत त्यांनी भौतिकशास्त्रात उच्च दर्जाचे संशोधन केले. त्या छोटया कालखंडात, त्यांनी इलेक्ट्रॉन व त्याचा प्रतिकण पॉझिट्रॉन यांच्यातील परस्पर क्रियांविषयीचे संशोधन करून इलेक्ट्रॉन्सनी केलेल्या पॉझिट्रॉनच्या स्कॅटरिंगचा सिध्दांत मांडला.तो आजही 'भाभा स्कॅटरिंग' म्हणून ओळखला जातो व भौतिकशास्त्रात, विशेषत: कण-त्वरित्रामध्ये (पार्टिकल ऍक्सिलरेटरमध्ये) त्या सिध्दांताचा दैनंदिन वापर होतो. भाभा स्कॅटरिंगच्या कॅस्केडिंग  परिणामाद्वारे त्यांनी अवकाशात होणा-या 'कॉस्मिक शॉवर'च्या घटनेचे स्पष्टीकरण दिले. डिरॅक यांच्या सापेक्षतासिध्द समीकरणांचा त्यांनी क्वांटम इलेक्ट्रॉनिक्समध्ये केलेला यशस्वी वापर त्या समीकरणांचा सर्वात महत्त्वाचा उपयोग मानला जातो. थोडया कालावधीत केलेल्या या कार्यासाठी व पुढील अणुक्षेत्रातील कामगिरीसाठी ते नोबेल पुरस्कार मिळण्यास पात्र होते, असे अनेकांना वाटते, पण तसे झाले मात्र नाही.
 
एशियाटिकमध्ये मुंबई संशोधन केंद्र

photo2मुंबईच्या सांस्कृतिक उच्चाभिरुची एक ओळख म्हणजे 'एशियाटीक सोसायटी'. 26 नोव्हेंबर 1804 म्हणजे दोनशे पाच वर्षापूर्वी त्या वेळचे मुंबई उच्च न्यायालयाचे रेकॉर्डर ( म्हणजे सर्वोच्य न्यायमूर्ती) सर जेम्स मॅकिटोश (Sir Jems Mackintosh) यांनी मुंबई परिसराचा व शहराचा सखोल अभ्यास करण्याकरिता समविचारी मंडळींना एकत्र आणले. 
पुरातन वस्तूशास्त्र, मानवशास्त्र, समाजशास्त्र यांच्या सखोल अभ्यास चितनातून मुंबईच्या आणि त्याच्या अनुषंगाने भारताच्या प्राचीन गौरवशाली संस्कृतीचा शोध हा या सा-या ज्ञानपिपास लोकांच्या अभ्यासाचा गाभा होता. मिळतील त्या कागद पत्रांची अचूकतेने छाननी, विश्वासार्ह इतिहासाच्या नोंदी आणि त्या करतां निर्दोष कार्यपद्धतीची प्रणाली निर्माण करुन 'एशियाटिक'चा सहढ पाया घालण्याचे काम या ब्रिटीश विद्वानांनी केले.
एशियाटिकमध्ये एक लाखहून अधिक एवढी प्रचंड ग्रंथसंपदा आहे. पंधरा हजारांहून अधिक दुर्मीळ ग्रंथ, पोथ्या-हस्त लिखिते या खजिन्यात आहेत. तर तीन हजार संस्कृत, प्राकृत, पर्शियन प्राचीन हस्तलिखिते ही जतन केलेली आहेत. 

Source---http://www.thinkmaharashtra.com/think1/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=39&Itemid=40
Reblog this post [with Zemanta]

No comments:

Post a Comment