Wednesday, December 29, 2010

भूगोल, पर्यावरणीय मुद्दे आणि इतिहासाचा चक्रव्यूह भेदताना







विद्यार्थीमित्रहो, आज आपण ‘भारताचा व जगाचा भूगोल’ (प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक), ‘पर्यावरणीय पारिस्थितीकी आणि हवामान बदल’ यासंबंधी मुद्दे आणि ‘भारताचा इतिहास व स्वातंत्र्यलढा’ या बदललेल्या सामान्य अध्ययनातील तीन अभ्यासघटकांच्या अभ्यासाविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. वास्तविक पाहता ‘भारताचा व जगाचा भूगोल’ आणि ‘पर्यावरण पारिस्थितीकी आणि हवामान बदल’ हे दोन भिन्न घटक म्हणून सामान्य अध्ययनात समाविष्ट केले असले तरी त्यांचा परस्परांशी जवळचा संबंध आहे किंबहना ते परस्परव्याप्त आहेत हे लक्षात घ्यावे. तथापि ‘पर्यावरण’ हा घटक एकंदर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यवस्था व सार्वजनिक धोरणनिर्मितीतील महत्त्वाचा घटक बनल्यामुळे त्यासंबंधी कळीचे मुद्दे जाणीवपूर्वक यूपीएससी पूर्वपरीक्षेतील सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये स्वतंत्र घटक म्हणून समाविष्ट केले आहेत.

गेल्या १० वर्षांतील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास असे लक्षात येते की, सामान्य अध्ययनात, चालू घडामोडींच्या घटकानंतर महत्त्वपूर्ण असणारा घटक म्हणजे भूगोल. या विश्लेषणावर आधारित आकडेवारी (जुन्या पद्धतीनुरूप) पुढील तक्त्यात दिली आहे. या घटकाची तयारी अर्थात त्याचा अभ्यासक्रम पाहनच करायची आहे. ढोबळमानाने भूगोलाच्या घटकात सामान्य भूगोल, जगाचा भूगोल व भारताचा भूगोल अशी विभागणी करता येते. समान्य भूगोलात विश्वाची रचना, सूर्यमंडल, पृथ्वी, इतर गृह व त्यांचे उपग्रह इ. चा समावेश होतो. प्राकृतिक, आर्थिक व मानवी अशी जगाच्या भूगोलाची व्याप्ती दिसून येते. भारताच्या भूगोलाबाबतही प्राकृतिक, आर्थिक, राजकीय व मानवी भूगोल असे उपघटक दिसून येतात.
भूगोलाच्या अभ्यासक्रमाचे अवलोकन केल्यानंतर यावर विचारलेल्या मागील प्रश्नांच्या स्वरूपाकडे लक्ष द्यायचे आहे. पुढील तक्त्यात दिल्याप्रमाणे भूगोलाच्या उपरोक्त अभ्यासक्रमावर आधारित २५ ते ३० प्रश्न पूर्वपरीक्षेत विचारलेले दिसून येतात.

प्रश्नप्रत्रिकातील या प्रश्नांचे वाचन केल्यास असे लक्षात येईल की हे प्रश्न साधारणत:
(१) थेट, सरळ व माहिती प्रधान 
(२) आकडेवारी विचारणारे 
(३) नकाशावर आधारित आणि 
(४) संकल्पनात्मक प्रश्न, 

अशा प्रकारे वर्गीकृत करता येतात. उदाहरणार्थ २०१० मध्ये ‘ग्रीनडेक्स २००९ स्कोअर’ काय आहे? हा प्रश्न विचारला होता. किंवा २००९ मध्ये विचारलेला ‘कोणत्या उपग्रहास सर्वाधिक नैसर्गिक उपग्रह आहेत? हा प्रश्न माहितीप्रधान सरळ स्वरूपाचा आहे. खनिजे, ऊर्जा संसाधने व विविध औद्योगिक उत्पादनाशी संबंधित आर्थिक भूगोलावर आधारित प्रश्नात आकडेवारी विचारली जाते. उदा. २०१० मध्ये खालीलपैकी कोणत्या पिकाखालील क्षेत्र गेल्या दशकात बहतांश कायम राहिले आहे? हा प्रश्न किंवा २००८ मध्ये ‘खालीलपैकी कोणत्या शहरांची लोकसंख्या दहा लक्षापेक्षा अधिक आहे?’ अथवा ‘भारताच्या एकूण लोकसंख्येत ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांचे प्रमाण किती?’ हा प्रश्न आकडेवारीवर आधारित आहे. २०१० च्या प्रश्नपत्रिकेत मल्लाकातून प्रवास करताना कोणते शहर आढळते? हा प्रश्न किंवा २००८ मध्ये ‘खालीलपैकी कोणते शहर विषुववृत्ताच्या नजीक आहे?’ हा प्रश्न अथवा ‘खालीलपैकी कोणकोणत्या देशांच्या सीमा मोल्दोवा या देशाशी सामाईक आहेत? हा प्रश्न नकाशाधारित आहे. या प्रश्नांच्या प्रकारात सामाईक सीमा (देश, शहरे), नद्या व देश, नद्याकाठची शहरे, प्रकल्पाचे ठिकाण वारंवार विचारले जाते.

अ‍ॅसर्शन व रीझिनगचे प्रश्न हे संकल्पनात्मक प्रश्न असतात. प्राकृतिक रचनेची वैशिष्टय़े, हवामान प्रकार इ.शी संबंधित प्रश्न संकल्पनात्मक स्वरूपाचे असतात. 
उदा.२०१० च्या प्रश्नपत्रिकेत ‘भारतात काही भागात लालमृदा आढळते त्याचे काय कारण आहे?’ अथवा ‘किंग कोब्रा हा एकमेव साप आपले घरटे का बनवतो?’ हे प्रश्न संकल्पनात्मक व भूगोलातील तर्कावर आधारित आहेत.

प्रश्नांच्या या विश्लेषण- वर्गीकरणातूनच आपली अभ्यासाची पद्धती ठरवावी. म्हणजे काही विशिष्ट स्वरूपाचे प्रश्न वारंवार  विचारले जातात. उदा. नद्या व त्यावरील शहरे, प्रकल्प व देश, नद्या व प्रकल्प, जमाती व देश-प्रदेश, पर्वत-शिखरे-गवताळ प्रदेश, पर्जन्यमान व उत्पादने, जनगणना इ. घटकांवर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात. म्हणून याची सर्वागीण तयारी करावी. भूगोलाची तयारी करतांना आरंभापासून ते परीक्षेला जाईपर्यंत सतत करावयाची गोष्ट म्हणजे नकाशावाचन. प्रत्येकाने ‘टीटीके’ किंवा ‘ऑक्सफ़र्ड’चे नकाशा पुस्तक कायम आपल्याजवळ बाळगावे आणि प्रत्येक घटकाचे वाचन करतांना नकाशा समोर ठेवावा.
त्याचबरोबर कोरे अथवा रिकामे नकाशे वापरून विविध बाबींच्या स्थानांचा सरावही करावा. नकाशाद्वारे भूगोलाचा अभ्यास दृश्यात्मक व रसपूर्ण करता येतो. या संदर्भात लक्षात ठेवायची आणखी एक गोष्ट म्हणजे जनगणनेवर आधारित लोकसंख्येची वैशिष्टय़े विचारणारे अनेक प्रश्न आढळून येतात. साक्षरता-निरक्षरता, ग्रामीण-शहरी प्रमाण, स्त्री-पुरुष प्रमाण, दारिद्रय़रेषेखालील प्रमाण, नागरीकरणाचे प्रमाण, विविध आदिवासी जमातींचे प्रमाण, ज्येष्ठांचे प्रमाण, क्रियाशील लोकांचे प्रमाण, बालमृत्युदर, दरडोई उत्पन्न, महत्त्वाच्या रोगांनी बाधित लोकांचे प्रमाण इ. महत्त्वाच्या लोकसंख्यात्मक गुणवैशिष्टय़ांची सविस्तर तयारी केली पाहिजे.
भूगोलाच्या तयारीतील आणखी एक मध्यवर्ती बाब म्हणजे विविध घटकांवर विचारलेले प्रश्न हे त्या त्या घटकांशी संबंधित चालू घडामोडींचा संदर्भ असणारे दिसून येतात. म्हणजे सोप्या भाषेत भूगोलाशी संबंधित चालू घडामोडींची व्यवस्थितपणे तयारी करणे अत्यावश्यक ठरते.

उदा. २०१० मध्ये ‘मॉन ८६३’ ही मक्याची जात चर्चेत का होती?’

हा प्रश्न अथवा एलटीटीई विरोधी कारवायामुळे श्रीलंका चर्चेत असल्याने ‘एलिफ़न्टा पास’विषयी २००९ च्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारला.

निकोबार बेटावरील शोम्पेन जमात चर्चेत असल्याने त्यावर प्रश्न विचारला गेला.

त्यामुळे भूगोलाच्या व्याप्तीत येणाऱ्या सर्व चालूघडामोडींची व्यवस्थितपणे तयारी करणे अत्यावश्यक ठरते.

त्या दृष्टीने गेल्या वर्षभरातील चर्चेतील ठिकाणे, प्रकल्प, विविध परिषदांची ठिकाणे, त्या परिषदांचे फ़लित, लोकसंख्या व खनिजे, ऊर्जा व उत्पादनाचे कल, हवामान बदलाशी संबंधित बाबी, मान्सूनविषयक तपशील, अवकाश मोहिमा, नैसर्गिक आपत्ती इ. ची तयारी मूलभूत ठरेल. ही तयारी करताना चर्चेतील मुद्दय़ांशी संबंधित सर्वागीण माहिती जमा करावी.

अर्थात ही सर्व तयारी करण्यासाठी दर्जेदार, प्रमाणित व अद्ययावत संदर्भग्रंथाची यादी अटळ ठरते. त्या दृष्टीने ६ वी ते १२ वीची उएठढ ची पुस्तके (त्यात ८ ते १२ वीच्या पुस्तकांवर विशेष भर द्यावा) पायाभूत ठरतात. म्हणूनच विदय़ार्थ्यांनी यावर प्रभुत्व प्रस्थापित केले पाहिजे.

त्याचबरोबर जी.सी. लिआँग यांचे प्राकृतिक भूगोलावरील पुस्तक एक प्रकारचा गुरूग्रंथच आहे. जनगणना, उत्पादनांचे कल यासाठी ‘इंडिया इयर बुक २०११’ व फेब्रुवारीत प्रकाशित होणारा ‘आर्थिक पाहणी अहवाल’ पाहावा. 

याच्या जोडीला टीटीके अथवा ऑक्सफ़र्डचे नकाशापुस्तक घ्यावे. िहदू, फ्रंटलाईन, योजना, क्रोनिकल व विझार्डमधून भूगोलाशी संबंधित चालू घडामोडींची तयारी करावी.

‘पर्यावरणसंबंधी कळीच्या मुद्दय़ां’ची तयारी करताना पर्यावरण, त्यातील घटक, त्यांचे स्वरूप व वैशिष्टय़े यांचा अभ्यास प्रथम करावा. त्यानंतर त्याविषयक समस्या, त्यांचे स्वरूप, कारणे व परिणाम यावर लक्ष द्यावे. उदा. जागतिक तापमानवाढ म्हणजे काय? तिची नेमकी कोणती कारणे आहेत आणि परिणाम काय आहेत याचा सविस्तर अभ्यास करावा. महत्त्वाचे म्हणजे या समस्यांवर उपाय योजन्यांसाठी स्थानिक, राष्ट्रीय व जागतिक पातळीवर झालेल्या प्रयत्नंची पूर्ण माहिती जमा करावी. यात विविध परिषदा, बैठका, त्यातील चर्चा, करारनामे, निर्माण केलेल्या यंत्रणा, त्यासंबंधी विविध देशांच्या भूमिका, त्यातील मतभिन्नता, त्याची कारणे इ.संबंधी माहिती तक्त्याच्या स्वरूपात तयारी करावी. त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्रीय शासनाने पर्यावरणासंबंधी केलेली धोरणे, कार्यक्रम, घेतलेले पुढाकार, या संदर्भात कार्य करणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्ती व संस्था, त्यासाठी त्यांनी केलेले संशोधन, त्यासाठी मिळालेली पारितोषिके इ.ची माहिती संकलित करावी. पर्यावरणीय कारणांमुळे चर्चेत असलेल्या प्रकल्पाचीही तयारी करणे गरजेचे आहे. उदा. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प. हा भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असून महाराष्ट्रात उभारला जात आहे. थोडक्यात, पर्यावरणीय मुद्दय़ांसंबंधी एका बाजूला ऐतिहासिक पाश्र्वभूमी व दसऱ्या बाजूला त्यासंबंधी चालू स्थितीविषयक माहिती संकलित करावी. 

‘भारताचा इतिहास व स्वातंत्र्यलढा’ या घटकात रूढार्थाने प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारत अशी विभागणी दिसून येते.

गेल्या काही वर्षांपासून प्राचीन व मध्ययुगीन इतिहासावर ६ ते ७ प्रश्नच विचारले जातात. भारताच्या स्वातंत्र्यलढय़ावरच मुख्य भर दिलेला दिसून येतो, ज्यावर १०-१५ प्रश्न (जुन्या पद्धतीत) विचारले जात असत.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी इतिहासाची तयारी करताना प्राचीन व मध्ययुगीन इतिहासास पर्याप्त वेळ देऊन आधुनिक इतिहासासाठी अधिक वेळ देणे गरजेचे ठरते.

इतिहासाची तयारी करताना विद्यार्थी सनावळ्यातच गुरफ़टून जातो. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास कंटाळवाणा वाटतो. तथापि इतिहास म्हणजे केवळ सनावळ्या नव्हे. कोणताही कालखंड असला तरी त्यात येणाऱ्या विविध ऐतिहासिक टप्प्यांचे सूत्रबद्ध वर्गीकरण केलेले असते. त्याचा कालखंड लक्षात घेऊन त्यासंबंधी ऐतिहासिक वास्तू व ठिकाणे, सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय व आर्थिक परिस्थिती लक्षात घ्यावी. थोडक्यात, प्रत्येक कालखंडाची त्याच्या सामाजिक-राजकीय-आर्थिक वैशिष्टय़ांसह तयारी केल्यास ऐतिहासिक कालखंड, त्यातील टप्पे, त्यातील संक्रमण, संबंधित अनेक व्यक्ती, घटना व ठिकाणांची माहिती लक्षात घेणे व ती स्मरणात ठेवणे सुलभ जाते. त्यामुळे इतिहासाची तयारी करताना थोडा व्यापक विचार करावा. दसरे म्हणजे राजेरजवाडे, त्यांच्या कार्याविषयी आपापल्या सोईनुसार काही सांकेतिक शब्द तयार करून पाठांतराचे एक स्वत:चे तंत्र विकसित करता येते. म्हणजे ३ प्रत्येकाच्या नावातील आद्याक्षर, त्यांचा क्रम, त्यांनी निर्माण केलेल्या बाबींशी जोडल्यास काहीएक शब्द तयार होऊ शकतो. अर्थात अभ्यासाची सुरुवात केल्यावरच हे तंत्र अवगत करता येते. या संदर्भात ‘डायरीचा फ़ॉर्म’ महत्त्वाचा मानावा. स्वातंत्र्यलढय़ाची तयारी करताना ब्रिटिश शासनव्यवस्था; प्रत्येक व्हाइसरॉयचा कालखंड, त्यांनी केलेले विविध कायदे, राबवलेली धोरणे; समाज-धर्मसुधारणा चळवळ, व्यक्ती व संघटना; राष्ट्रवादाचे टप्पे, राष्ट्रीय काँग्रेसचा प्रवाह; आदिवासी-शेतकरी, क्रांतिकारक, स्त्रिया यांच्या चळवळी; आधुनिक भारताचे प्रमुख इतिहासकार, अभ्यासक व विश्लेषक, त्यांचे ग्रंथ, त्यांची मते अशा प्रमुख विषयांना केंद्र मानून तयारी करावी. इतिहासाच्या संदर्भाबाबत प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारतावरील उएठढ ची पुस्तके पायाभूत मानावीत. 

याखेरीज स्वातंत्र्यलढय़ासाठी बिपन चंद्रा यांचे ‘भारताचा स्वातंत्र्यलढा’ आणि ग्रोवर आणि ग्रोवर यांचे आधुनिक भारतावरील पुस्तक सविस्तरपणे वाचावे.  

तिन्ही घटकांना पुरेसा वेळ, संदर्भित पुस्तकांचे तीन वेळा वाचन, उजळणीचे वेळापत्रक आणि यावरील वस्तुनिष्ठ प्रश्नांचा भरपूर सराव केल्यास सामान्य अध्ययनात निर्णायक ठरणाऱ्या या घटकांची चांगली तयारी करता येईल.

No comments:

Post a Comment