Tuesday, March 6, 2012

सी. डी. देशमुख

**चिंतामण द्वारकानाथ देशमुख ऊर्फ सीडी ही एक असामान्य बुद्धिमत्ता असलेली महान व्यक्ती होती. १४ जानेवारी १८९६ साली रायगड जिह्यातल्या नाटा या गावी सीडींचा जन्म झाला. त्यांचे वडील द्वारकानाथ देशमुख मोठे नावाजलेले वकील होते. आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत सीडींनी कधीही पहिला नंबर सोडला नाही. मुंबई विद्यापीठाच्या मॉट्रिकच्या परीक्षेत ते पहिले आले. जगन्नाथ शंकरशेट संस्कृत शिष्यवृत्ती परीक्षेत ते पहिले आले. पुढे केंब्रीज विद्यापीठातून त्यांनी विज्ञानाची पदवी घेतली, तिथे ते पहिले आले आणि आय.सी.एस. (इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस) या परीक्षेतही ते पहिले आले.

**अशा असामान्य बुद्धिमत्तेचा ब्रिटिशांनी योग्य वापर करून घेतला नसता तरच नवल. सन १९२० मध्ये म्हणजे वयाच्या २४व्या वर्षी ते आय.सी.एस. झाले. त्यांच्या करिअरची सुरुवात `सी. पी. बेरार स्टेट' (त्या काळी मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांचे मिळून असलेले राज्य)चे उपायुक्त म्हणून झाली. भराभर पायर्या चढत १९३९ साली ते सेक्रेटरी पदापर्यंत पोहोचले. याच साली रिझर्व बँकेत लाएसन ऑफिसर म्हणून त्यांची नेमणूक झाली. बँकेतील घडामोडींकडे लक्ष ठेवून त्या घडामोडींबाबत सरकारला माहिती देण्याचं महत्त्वाचं काम त्यांच्यावर सोपविण्यात आलं. पुढे रिझर्व बँकेचे सेक्रेटरी, डेप्युटी गव्हर्नर आणि मग १९४३ साली ते भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर झाले. रिझर्व बँकेचे गव्हर्नर बनणारे ते पहिले भारतीय होते. पुढे सहा वर्ष ते गव्हर्नर पदावर राहिले. तेथे त्यांनी स्वत:ची छाप सोडली. ते रिझर्व बँकेचे अत्यंत यशस्वी गव्हर्नर ठरले. रिझर्व बँकेच्या कारभारात त्यांनी असंख्य सुधारणा केल्या. अनेक पद्धतींमध्ये सुयोग्य बदल केले. बँकेच्या वार्षिक अहवालात भारताचं संपूर्ण वर्षाचं वित्तीय चित्र सादर करण्याची पद्धत त्यांनी सुरू केली. मुख्य म्हणजे मोठय़ा उद्योगधंद्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी `इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'ची स्थापना त्यांच्याच देखरेखीखाली करण्यात आली. देशात पहिल्यांदाच ग्रामीण भागातील शेतकर्यांना कर्ज देण्याची सुविधा त्यांनी सुरू केली. देशातील कृषी उद्योगाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरली. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेचा आदर राखून ब्रिटिश सरकारनं १९४४ मध्ये त्यांना `सर' ही पदवी बहाल केली.

**रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून त्यांची नेमणूक झाल्यावर अजून एक महत्त्वाची गोष्ट घडली. ब्रिटिश काळातील भारतीय चलनी नोटांवर सी. डी. देशमुखांची सही छापण्यास सुरुवात झाली. चलनी नोटांवर सही करणारे सीडी हे पहिले भारतीय ठरले.

**पुढे त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताचं प्रतिनिधित्व केलं. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड (आय.एम.एफ.) येथेही त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यांनी आय.एम.एफ.च्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचं अध्यक्षपदही भूषविलं.

**याच दरम्यान देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टीनं पाऊलं उचलली जात होती. भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण देशाला अत्यंत दुर्देवी अशा फाळणीला सामोरं जावं लागलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालमत्तेचं वाटप आणि देशावर असलेल्या कर्ज आणि इतर बोजा यांची विभागणी हे एक अत्यंत नाजूक काम होतं. ते काम सीडींच्या देखरेखीखाली पार पडलं.

**१ जानेवारी १९४९ साली रिझर्व बँकेचं जे राष्ट्रीयीकरण झालं त्याचीही महत्त्वाची जबाबदारी सीडींवर होती. भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी सीडींना या योजनेत सामील करून घेतलं. भारताचा आर्थिक पाया मजबूत करण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं. दुसर्या पंचवार्षिक योजनेचा आराखडाही त्यांनी तयार केला. लगेचच ते नेहरूंच्या केंद्रीय मंत्रीमंडळात वित्तमंत्री म्हणून रुजू झाले. भारतासारख्या विकसनशील देशाचा जलद आर्थिक विकास व्हावा, समाजाला आर्थिकदृष्टय़ा न्याय मिळावा आणि देशाला आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावं, या दृष्टीनं ते सतत प्रयत्नशील राहिले. नवीन कंपनी कायदा, स्टेट बँका आणि आयुर्विमा कंपन्यांचं राष्ट्रीयीकरण यामध्येही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

**१९५६ सालापर्यंत ते नेहरूंच्या मंत्रीमंडळात वित्तमंत्री राहिले. आणि मग मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला पाठिंबा देण्याच्या हेतूनं त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

**अर्थात, त्यानंतरही त्यांची लोकसेवा आणि देशसेवा सुरूच राहिली. १९५६ ते १९६० दरम्यान त्यांनी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचं अध्यक्षपद भूषविलं. भारतातील सर्व विद्यापीठांच्या दरम्यान समन्वय साधणं आणि विद्यापीठांचा दर्जा वाढविणं हे या कमिशनचं मुख्य काम होतं. १९६२ ते १९६७ दरम्यान ते दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू होते. खरं तर या काळापर्यंत ते जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ झालेले होते. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आर्थिक सल्लागार त्यांची नेमणूक करायला तयार होत्या. तेथे त्यांना गलेलठ्ठ पगारही मिळाला असता. एवढंच नव्हे, तर आय.एम.एफ.चे मॅनेजिंग डायरेक्टर होण्याचं निमंत्रणही त्यांना आलं होतं. पण ते नाकारून त्यांनी भारतातच राहण्याचं ठरवलं.

**सी. डी. देशमुखांचं व्यक्तिमत्त्व हरहुन्नरी होतं. खरं तर ते विज्ञानाचे पदवीधर. पण नंतर ते अर्थकारणात शिरले. त्यांना जगातील सात भाषा उत्तमरित्या अवगत होत्या. ते बॅडमिंटनही चांगलं खेळायचे. रोज सकाळचा वेळी ते बागकाम करायचे. तत्त्वज्ञान हाही त्यांचा आवडीचा विषय होता. संस्कृत भाषेचे तर ते पंडितच होते. १९६९ साली त्यांच्या संस्कृत कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. केंद्र सरकारचे वित्तीय अंदाजपत्रक सादर करताना त्यांच्या भाषणामध्ये ते संस्कृत सुभाषितांची छान पेरणी करायचे. विरोधी पक्षाच्या प्रश्नाला उत्तर देण्याची त्यांची शैली अत्यंत विनम्र होती. आपला मुद्दा, आपले विचार स्पष्टपणे मांडण्यात ते वाक्बगार होते. त्यांचं वक्तृत्वही उत्तम होतं. सीडींच्या वक्तृत्वगुणाची आठवण म्हणून भारतीय रिझर्व बँकेनं १९८५ सालापासून `सी. डी. देशमुख स्मृती व्याख्यानमाला' सुरू केली.

**त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेची आणि त्यांनी केलेल्या देशसेवेची सर्व थरांतून चांगली दखल घेतली गेली. त्यांना अक्षरश: असंख्य देशी-विदेशी सन्मान प्राप्त झाले. आर्थिक क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असामान्य कामगिरी केल्याबद्दल १९५९ साली त्यांना फिलिपिन्सच्या जोस ऍग्विलर यांना संयुक्तपणे शासकीय सेवा या क्षेत्रातला मॅगेसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला. १९७५ साली त्यांना पद्मविभूषण या पदवीनं गौरविण्यात आलं.

सी. डी. देशमुखांनी आपल्या व्यस्त जीवनशैलीमधून वेळ काढून स्वत:चं आरोग्यही उत्तम राखलं होतं. त्यामुळे त्यांना दीर्यायुष्य लाभलं. वयाच्या ८७ व्या वर्षी म्हणजे १९८२ साली हैदराबाद येथे त्यांचं निधन झालं

1 comment:

  1. welcome to my website for this information contact your friend and family etc. -----------
    Babk exam
    IBPS Clerk Online
    crack IBPS entrance exam

    ReplyDelete