Sunday, June 6, 2010

४ जून ‘पुण्यश्लोक’ अहिल्याबाई होळकर जयंती


मराठय़ांच्या इतिहासात अनेक पराक्रमी सरदार होऊन गेले. त्यामधील होळकर घराण्यातील अहिल्याबाईंचे नाव आजही अनेकांच्या तोंडावर आहे. 
 
अहिल्याबाईंना ‘पुण्यश्लोक’ असेही म्हणतात. कारण त्यांनी केलेले सामाजिक कार्य आजही
अनेकांसाठी आदर्शवत असेच ठरले आहे. घरचा आणि राज्याचा कारभार पाहण्यात
हुशार असलेल्या अहिल्याबाई होळकरांचे साम्राज्य मध्यप्रदेशात असले तरी त्या
मुळच्या मराठवाडय़ातील.
बीड जिल्ह्य़ातील चौंडी हे त्यांचे मूळ गाव. माणकोजी
शिंदे-पाटील यांची अहिल्या नावाची ही मुलगी लहानपणापासूनच धाडसी होती.
तसेच राज्यकर्त्यांना आवश्यक असणारे सर्व गुण तिच्याजवळ लहानपणापासूनच
होते.एकदा चौंडी गावात थोरले बाजीराव पेशवे यांच्या सैन्याचा तळ पडला होता. सीना नदीच्या काठी असलेल्या एका देवालयात दर्शनासाठी म्हणून छोटी अहिल्या आपल्या आईबरोबर गेली होती. तेथे नदीच्या वाळूत खेळताना अहिल्येने वाळूचे एक शिवलिंग बनविले. तेवढय़ात सैन्यदलातील एकाचा घोडा उधळला. उधळलेला घोडा आपल्याच दिशेने येत असल्याचे पाहून अहिल्याबरोबरच्या मैत्रिणी भिऊन पळून गेल्या.मात्र अहिल्या मुळीच डगमगली नाही. तिने आपण तयार केलेल्या शिवलिंगावर पालथे पडून त्या शिवलिंगाचे रक्षण केले.

              तेवढय़ात पाठीमागून आलेल्या श्रीमंतांनी थोडय़ाशा जरबेच्या आवाजातच अहिल्येला म्हटले की, पोरी तुला घोडय़ाने तुडवले असते तर? त्यावर अहिल्याबाई आपले डोळे श्रीमंतावर रोखत म्हणाली की, हे शिवलिंग मी घडविले आहे व आपण जे घडविले आहे त्याचे प्राणपणाने रक्षण करावे असे थोरली माणसे सांगतात. मी तेच केले आहे. तिचे बाणेदार उत्तर ऐकूण श्रीमंत तर खूष झालेच परंतु त्यांच्याबरोबर असलेले सरदार मल्हारराव होळकर यांनी छोटय़ा अहिलेला आपली सून करून घेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे मल्हाररावांनी तिला आपली सून करून घेतली आणि अहिल्याबाईंनी देखील नंतर मल्हाररावांचा निर्णय सार्थ ठरविला व होळकर घराण्याची कीर्ती सर्वदूर पोहोचविली.

No comments:

Post a Comment