Friday, February 10, 2012

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान

बहुतांश आजार हे अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यामुळे होतात हे लक्षात घेऊन शासनाने २०००-०१ पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली. प्रचंड लोकसहभागाने या चळवळीला लोकचळवळीचे रूप दिले एवढेच नाही तर कोटय़ावधी रुपयांची विकास कामे ही लोकसहभागातून करण्यात आली. शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी, घराची स्वच्छता आणि अन्न काळजी, वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, सांडपाण्याचे नियोजन आणि घनकचर्‍याचे व्यवस्थापन , मानवी मल-मूत्राची विल्हेवाट यासारख्या विभागात काम करून गावांनी अतिशय उत्स्फुर्तपणे ग्रामविकासाचा पाया मजबूत केला.

**गावातील विद्यार्थी असो की अंगणवाडी सेविका-मदतनीस, सरपंच असो की महिला भगिनी सर्वांनी या योजनेत भरीव योगदान तर दिलेच परंतु गावाच्या सामाजिक तसेच आर्थिक विकासाला गती ही दिली. स्वखुषीने स्वच्छता दूत म्हणून काम करणार्‍या या सर्व लोकांनी गावागावात स्वच्छतेची ग्रामधून निर्माण केली आणि आरोग्यसंपन्न आणि सुदृढ आरोग्याचा पाया रोवला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

**एकदा अभियानात सहभाग घ्यायचा म्हटले की नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी झाली. गावस्वच्छता, शाळा व अंगणवाडय़ांची स्वच्छता, सार्वजनिक इमारती, गुरांचे गोठे, रस्ते दुरुस्ती, रस्ते सफाई, पाणी शुद्धता, सुदृढ बालक स्पर्धा, माता-बाल संगोपन, साथीचे रोग प्रतिबंधक उपाययोजना यासारख्या अनेक कामांना गती मिळाली.

**चांगले काम करणार्‍या आणि निकषांची पुर्तता करणार्‍या ग्रामपंचायतींना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेअंतर्गत प्रत्येक स्तरावर पारितोषिक देऊन गौरविले जाऊ लागले. साने गुरुजी स्वच्छ शाळा आणि सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी स्पर्धेतून बालकांच्या आरोग्याची मजबूत पायाभरणी
झाली. कुटुंब कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या ग्रामपंचायतींना स्व. आबासाहेब खेडकर पुरस्काराने तर पिण्याचे शुद्ध पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या ग्रामपंचायतींना स्व. वसंतराव नाईक पुरस्काराने गौरविले जाऊ लागले. सामाजिक एकतेची चांगली वीण गुंफणार्‍या ग्रामपंचायतींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर पुरस्कार दिला जाऊ लागला तर या अभियानाची उत्कृष्ट प्रसिद्धी करणार्‍या पत्रकारास श्री.यशवंतराव चव्हाण यांच्या नावे जिल्हा पुरस्कार दिले जाऊ लागले.

संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियानात पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती -
•    वर्ष २०००-०१ , पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची संख्या १,१५५ , रुपये (रक्कम लाखात) ७१९.२४
•    वर्ष २००१-०२ , पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची संख्या १,१५६ , रुपये (रक्कम लाखात) ७९७.७०
•    वर्ष २००२-०३ , पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची संख्या १,१६० , रुपये (रक्कम लाखात) ९००.००
•    वर्ष २००३-०४ , पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची संख्या १,१६७ , रुपये (रक्कम लाखात) ९७५.००
•    वर्ष २००४-०५ , पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची संख्या १,१६२ , रुपये (रक्कम लाखात) ९७५.००
•    वर्ष २००५-०६ , पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची संख्या १,१५९, रुपये (रक्कम लाखात) ९७५.००
•    वर्ष २००६-०७ , पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची संख्या १,१७९, रुपये (रक्कम लाखात) १०००.००
•    वर्ष २००७-०८ , पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची संख्या १,१७७, रुपये (रक्कम लाखात) १०९९.००
एकूणपुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची संख्या ९,३१५ , रुपये (रक्कम लाखात) ७,४४०.९४

संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत दिले जाणारे प्रत्येक स्तरावरील पुरस्कार(रुपये)
• बक्षीस क्रमांक प्रथम, पंचायत समिती स्तर २५ हजार, जिल्हा स्तर ५ लाख, विभागीय स्तर १० लाख, राज्य स्तर २५लाख

• बक्षीस क्रमांक द्वितीय, पंचायत समिती स्तर १५ हजार, जिल्हा स्तर ३ लाख, विभागीय स्तर ८लाख, राज्य स्तर २०लाख

• बक्षीस क्रमांक तृतीय, पंचायत समिती स्तर १०हजार, जिल्हा स्तर २लाख, विभागीय स्तर ६लाख, राज्य स्तर १५लाख

**याशिवाय पंचायत समितीचे संपूर्ण कार्यक्षेत्र हागणदारी मुक्त झाल्यास आणि केंद्र शासनाकडून निर्मल ग्राम पुरस्कार मिळालेला असल्यास या पंचायत समितीला संबंधित वर्षात राज्य शासनाकडून ४ लाख रुपयांचा राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वच्छ पंचायत समिती पुरस्कार दिला जातो.

**असेच कार्य जिल्हा परिषदेमार्फत झाल्यास त्यास राज्य शासनाकडून संबंधित वर्षात २० लाख रुपयांचा राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वच्छ व हागणदारी मुक्त जिल्हा परिषद पुरस्कार दिला जातो.

**एका जिल्ह्यातील किमान ५० ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार मिळाल्यास त्या जिल्हा परिषदेस १० लाख रुपयांचा राष्ट्रपिता महात्मा गांधी स्वच्छ जिल्हा परिषद पुरस्कार दिला जातो.

**सामाजिक एकतेचा संदेश घेऊन या अभियानातून अनेक गावं विकासाच्या दिशेने जाऊ लागली. राज्याची स्वच्छतेची टक्केवारी १९ टक्क्यांवरून ६५ टक्क्यांपर्यंत वाढली ती याच अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे.

**त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेत शासन अनुदानावर विसंबून न राहता लोकसहभागातून फार मोठय़ा प्रमाणात ग्रामविकास होतो हे या अभियानाने दाखवून दिले आणि गावं एका दिलाने एका मताने विकासाच्या कामाला लागली.

**गावात परसबागा फुलल्या, गोबरगॅस, बायोगॅस सारखे प्रकल्प उभे राहतांना सौर ऊर्जेच्या वापराला चालना मिळाली. पाण्याचा पुनर्वापर, पाणी अडवा-पाणी जिरवा यासारख्या मोहीमा हाती घेण्यात आल्या. खत निर्मिती प्रकल्प सुरु झाले.

**राज्य शासनाच्या या उपक्रमाची दखल युनिसेफ आणि डब्ल्युएसपी सारख्या बाह्य साहय करणार्‍या संस्थांनी देखील घेतली. उत्कृष्ट लोकसहभागाबद्दल राज्य शासनाच्या या उपक्रमाला Indian Express Innovation Award ने सन्मानित देखील करण्यात आले.

**संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाला मिळालेले यश पाहून केंद्र सरकारने देशपातळीवर निर्मल ग्राम नावाची योजना देशपातळीवर राबविण्यास सुरुवात केली.

**या योजनेच्या अंमलबजावणीतही राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे.

राज्याच्या ३३ जिल्ह्यात संपर्ण स्वच्छता कार्यक्रमाची अंमलबजावणी देखील केली जात आहे. निर्मल महाराष्ट्र निर्धार ज्योत, निर्मल महाराष्ट्र मेळावा, युवा स्वच्छता शिबीर, आंतरराष्ट्रीय हात धुवा दिन, गतिमान रथयात्रा, स्वच्छता उद्याने यासारख्या उपक्रमातून सुजल आणि निर्मल महाराष्ट्राची पायाभरणी केली जात आहे.

निर्मल ग्राम पुरस्कारात महाराष्ट्र देशात आघाडीवर -
• वर्ष २००५ पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती १३ , 
• वर्ष २००६ पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती ३८० , पुरस्कार प्राप्त पंचायत समित्या १
• वर्ष २००७ पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती १९७४ , पुरस्कार प्राप्त पंचायत समित्या
• वर्ष २००८ पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती ४३०१ , पुरस्कार प्राप्त पंचायत समित्या २
• वर्ष २००९ पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती १७२० , पुरस्कार प्राप्त पंचायत समित्या ६
• वर्ष २०१० पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती ६९४ ,

• एकूण - पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती ९०८२ , पुरस्कार प्राप्त पंचायत समित्या ९


संपूर्ण स्वच्छता कार्यक्रमांतर्गत भौतिक प्रगती

•    घटक वैयक्तिक शौचालये (बीपीएल), मंजूर ३५,१८,४७५ , साध्य २१,८०,२५४ ,
साध्य टक्केवारी ६२
•    घटक वैयक्तिक शौचालये (एपीएल), मंजूर ६३,६९, ३८० , साध्य ३९,०३,९५४ ,
साध्य टक्केवारी ६२
•    घटक वैयक्तिक शौचालये (बीपीएल), मंजूर ९८,८७,८५५ , साध्य ६०,८४,२०८ ,
साध्य टक्केवारी ६२
•    घटक , मंजूर अंगणवाडी शौचालये , मंजूर ५६,०८२ , साध्य ५६,६१० ,
साध्य टक्केवारी १०१ (मागणी आधारित)
•    घटक , मंजूर शालेय शौचालये , मंजूर ८७,४५२, साध्य ८४,१८४,
साध्य टक्केवारी ९७
•    घटक , मंजूर सार्वजनिक शौचालये , मंजूर ८,२१०, साध्य ४,१२२,
साध्य टक्केवारी ५१

**औद्योगिकरण आणि नागरिकीकरणाचा खूप मोठा वेग असलेल्या महाराष्ट्रातील शहरांमध्ये पाणी पुरवठा व स्वच्छतेच्या मुलभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सन २००२ पासून संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.

**अभियानाची अंमलबजावणी अधिक प्रभावी व्हावी यासाठी शासनाने राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात सुजल महाराष्ट्र निर्मल महाराष्ट्र हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्याचे हाती घेतले असून याअंतर्गत निकषांची पुर्तता करणार्‍या आणि शासनाबरोबर यासबंधीचा करार करणार्‍या नागरी संस्थांना पाणी पुरवठा आणि मलनि:स्सारण योजनेसाठी वाढीव अनुदान देण्यात येईल.

No comments:

Post a Comment