Friday, February 10, 2012

गांधीजींच्या संकल्पनेतील ग्रामविकास

**गांधीजी हे विसाव्या शतकातील अजूनही न उकललेलं कोडं आहे, आणि कदाचित ते कधीही न उलगडलं जाणारं विलक्षण गूढ आहे. जगातील अनेक वृत्तपत्र आणि नियतकालिकांनी, दूरचित्रवाहिन्यांनी, जनमत घेणाऱ्या तज्ज्ञांनी गांधीजींना विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ व्यक्ति म्हणून निवडलं. ही आपल्या भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. आज एकविसाव्या शतकातही गांधीजीचं तत्वज्ञान त्यांचे विचार तरुण पिढीला भारावून सोडत आहे.

**ग्राम स्वराज्याची कल्पना मांडतांना गांधीजी म्हणतात, प्रत्येक गावात गावकऱ्यांजवळ आपल्या कारभाराची पूर्ण सत्ता आणि अधिकार राहतील, जनतेच्या हातात सत्ता आली म्हणजे लोकांच्या स्वातंत्र्यावर होणारा हस्तक्षेप कमीत कमी होतो. जे राष्ट्र आपले कामकाज राज्याच्या हस्तक्षेपाशिवाय शांतपणे करुन दाखविते त्यालाच खऱ्या अर्थाने लोकशाही राष्ट्र म्हटले जाऊ शकेल, सरकारी नियंत्रणापासून मुक्त होण्यासाठी सतत प्रयत्न करणे हा स्वराज्याचा अर्थ आहे.

**माझ्या कल्पनेतील गावात शुध्द चैतन्याचा संचार राहील, प्राणीमात्र अंधाऱ्या गोठयात राहणार नाही, स्त्री, पुरुषांना संपूर्ण स्वातंत्र्य असेल, साऱ्या जगाचा मुकाबला करण्याची शक्ती त्यांच्यात असेल, गांधीजींच्या ग्राम स्वराज्याच्या संकल्पनेत मानवाचे कल्याण, शरीरश्रम, समानता, संरक्षण, विकेन्द्रीकरण, स्वदेशी, स्वावलंबन, सहयोग, सत्याग्रह, धार्मिक समानता पंचायत राज, नई तालीम या गोष्टींना प्राधान्य आहे.

**शहरे त्यांची काळजी घ्यायला समर्थ आहेत. आपल्याला खेडयांची काळजी घ्यायला पाहिजे. त्यांचे पूर्वग्रह, त्यांच्या भ्रामक समजुती, त्यांचा संकुचित दृष्टिकोन यांच्यापासून खेडयांना मुक्त करायला हवे आणि खेडूतांमध्ये राहून त्यांच्या सुखदु:खात वाटेकरी होऊन, शिक्षणाचा प्रसार करुन, त्यांना विविध विषयांची माहिती देऊन, आपल्याला हे काम करता येईल. याखेरीज अन्य कोणताही मार्ग नाही, असे गांधीजींना वाटत होते.

**आपण भर उन्हात शेतात काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांशी समरस झाले पाहिजे व ज्या तळयात खेडूत आंघोळ करतात, भांडी व कपडे धुतात, त्यांची गुरेढोरे पाणी पितात व डुंबतात त्या तळयातील पाणी प्यायला कसे वाटेल याचा विचार आपण केला पाहिजे. असे केल्यानंतरच आपण खरेखुरे लोकांचे प्रतिनिधित्व करु व लोकही आपल्या प्रत्येक आवाहनाला प्रतिसाद देतील,प्रतिसाद देती अशी गांधीजींची भावना होती.

**लायनेल कर्टिस याने आपली खेडी म्हणजे उकिरडे आहेत असे म्हटले आहे. या उकिरड्यांचे रुपातर गांधीजीना आदर्श खेडयात करावयाचे होते, कारण आपल्या खेडूतांच्याभोवती ताजी हवा असली तरी त्यांना ती घेता येत नाही. त्यांच्या भोवती ताजे अन्न असले त्यांना त्या आस्वाद घेता येत नाही. वेळ व पैसा यांची बचत, तसेच आरोग्य कसे राखावे यांचे ज्ञान खेडयातील लोकांना नाही. हे गांधीजीनी ओळखले होते व त्यादृष्टीने खेडयांमधे सुधारणा करण्याकरिता कार्यकरण्याचं गांधीजींनी ठरविले होतं.

**यासाठी गांधीजींनी प्रत्येक गावी एका शाळेची स्थापना केली. हे लोक गावातील लोकांना स्वच्छतेचे महत्व समजावून सांगत. त्याचप्रमाणे गावातील लोकांच्या आरोग्याकडे लक्ष पुरवीत. या शाळेत जुजबी औषधांची तयारी असे. शिक्षण याचा अर्थ गांधीजी 'जीवनाकरिता योग्य शिक्षण' असा करीत. म्हणूनच या शाळेत पुस्तकी शिक्षणावर भर नव्हता. गावातील लोकांना सफाईचे शिक्षण स्वयंसेवकांनी देण्यास सुरुवात केली. रस्ते, विहिरी आणि घराची अंगणे साफ करणे हे त्यांचे पहिले काम होते.

**ग्रामसुधारणा करावयाची म्हणजे लोकांना शिक्षण देणं आवश्यक आहे, असं गांधीजींना वाटलं. पण त्यावेळी इंग्रजांचं राज्य होतं. त्यांनी लोकांना पाश्चिमात्य पध्दतीने शिक्षण दिले होतं. म्हणूनच गांधीजींच्या मनात राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना आली. त्यांनी शिक्षणाची नवीन पध्दत काढली. यासाठी त्यांनी १९३८ साली सेवाग्राम येथे एक समिती स्थापन केली. या समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. झाकीर हुसेन यांना नेमले. या शिक्षण पध्दतीस वर्धा शिक्षण पध्दती किंवा बेसिक शिक्षण पध्दती म्हणतात.

**१९४५ साली हिंदुस्तानी तालिमी संघाच्या परिषदेत गांधीजींनी आपले विचार स्पष्ट केले. अथांग सागरातून प्रवास करताना ध्रुवतारा हा एकच मार्गदर्शक असतो. त्याप्रमाणे वर्धा शिक्षणामध्ये ग्रामोद्योग हा मुख्य उद्देश आहे. या योजनेमुळे आपण खेडेगावचे शिक्षक बनणार आहोत. म्हणजेच खेडयांचे सेवक. हे काम आपण मोबदला मिळेल म्हणून करावयाचे नाही. या योजनेस सरकारी सहाय्य नाही. म्हणूनच हा शिक्षणक्रम आपण यशस्वी करुन दाखवावयाचा आहे. यामुळे बालकांच्या मनाचा पूर्ण विकास होईल. खेडयाची उन्नती खेडयातील लोकच करु शकतील. त्यांना म्हणूनच स्वावलंबन शिकवावयाचे आहे. हेच आमच्या शिक्षण पध्दतीचे ध्येय आहे.

**भारतातील बहुसंख्य ग्रामीण लोकांचा मुख्य धंदा शेती. तिला पूरक म्हणून गांधीजींनी ग्रामोद्योगावर भर दिला. तसं करतांना त्यांनी काही मर्यादेपर्यंत यंत्रशक्तीचे स्वागतही केले. भारताच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करताना देशाच्या सात लक्ष खेडयांतून राहणाऱ्या जनतेची चिंता राजकीय नेत्यांनी आणि अर्थशास्त्रज्ञांनी केली पाहिजे असा गांधीजींचा नेहमी आग्रह राहिला होता. आज खेडयांतून राहणाऱ्या लक्षावधी लोकांना शेतीमधून संपूर्ण वर्षभर काम मिळू शकत नाही, एरवीही दिवसभर कष्ट करुन जो रोजगार मिळतो त्यावरच त्यांना राहावे लागत असे.

**भारताची परंपरागत अर्थव्यवस्था ग्रामीण विभागाच्या स्वयंपूर्णतेवर आधारलेली होती. खेडयातील १२ बलुतेदारांचे व्यवसाय एका अर्थाने गावातल्या गावात पूरक उद्योग निर्माण करीत असत, त्यायोगे शेतकऱ्यांना त्यांच्या बेकारीच्या काळात रोजगार उपलब्ध होत असे. निसर्गसंपत्तीवर योग्य प्रक्रिया करण्याचे काम खेडयातच चालत असल्याने एक नवी संपत्ती गावातल्या गावात निर्माण होई. शिवाय गावच्या बहुसंख्य गरजांच्या बाबतीत ते स्वयंपूर्ण होई. परकीय सत्तेमुळे मोठे उद्योगधंदे शहरातून सुरु झाले आणि खेडयातील

**व्यवस्थेला घरघर सुरु झाली. यावर मात करण्यासाठी गांधीजींनी ग्रामोद्योगावर भर देण्याचे ठरविले.ग्रामोद्योगांच्या पुनरुज्जीवनाचा आग्रह धरतांना गांधीजींचा भर त्यामागच्या मानवतावादी दृष्टीकोनावर होता. ग्रामोद्योगांसाठी इमारती, यंत्रसामुग्री, तंत्रज्ञांची आवश्यकता फारच मर्यादित असते. यंत्रशक्तीचा वापरही जरुर तेथेच होत असल्याने विजेचा आणि इंधनाचा खर्चही बेताचा. त्यामुळे मोठया प्रमाणात भांडवलाची आवश्यकता नसते. उत्पादन मात्र त्वरीत होवू शकते.

**ग्रामीण उद्योगांच्या उभारणीनंतर प्रत्यक्ष उत्पादन हाती येईपर्यंतचा काळ फारच थोडा असल्याने उत्पादनाचा फायदा मिळण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागत नाही. ग्रामोद्योगाचा पुरस्कार करतांना गांधीजींनी किती मूलगामी विचार केला होता, हे या विवेचनावरुन स्पष्ट होते. ग्रामोद्योगाचा पुरस्कार करुन गांधीजी देशात बैलगाडीवर आधारलेली अर्थव्यवस्था पुन्हा आणू पाहत होते.

**अर्थशास्त्राला योग्य समज असलेल्या कोणाही व्यक्तीला भारतासारख्या देशात ग्रामोद्योगाची आवश्यकता सहज पटण्यासारखी आहे. विख्यात स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक गुन्नार मिरडाल यांनी गांधीजींच्या ग्रामोद्योग-विकासाच्या कार्यक्रमाचे आग्रहपूर्वक समर्थन केले होते. ते म्हणतात, ग्रामोद्योगाशी स्पर्धा करणारे मोठे उद्योगधंदे प्रस्थापित करण्याने लक्षावधी खेडूतांना काहीच कामधंदा उरणार नाही. त्यांच्या तोंडचा घासच काढून घेतल्यासारखे होईल. नियोजनाच्या दृष्टीने ते विसंगत ठरेल. ग्रामोद्योगाच्या पुरस्कारामागे गांधीजींची दृष्टी ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या संतुलनाची आणि स्वावलंबनाची होती.

**अन्न वस्त्रांसारख्या किमान मूलभूत गरजांच्या बाबतीत तरी ग्रामीण जनतेने स्वावलंबी व्हावे. असा त्यांचा कटाक्ष होता म्हणूनच तेलघाणे, चर्मोद्योग, कुंभारी वगैरे परंपरागत उद्योग आणि हातकागद, नीरा, ताडगूळ वगैरे ग्रामोद्योग सुरु करण्यास त्यांनी स्फूर्ती दिली. ग्रामोद्योगाचा विकास होत जाईल तसतसे नवेनवे उद्योगही साविष्ट होऊ शकतील असा गांधीजींचा विचार होता.

**ज्या काळात महात्मा गांधीजींचा जन्म झाला आणि त्यांना जे जीवन जगावे लागले त्या काळाची जी सर्वात कठीण समस्या होती, ती होती सामान्य माणसाच्या जीवनाची. समाजात काहीही असले तरी साधारणत: दोन वर्ग नेहमीच निर्माण होत असतात. समाज म्हटला की, तो संघटित समूह आणि संघटित म्हणून त्यात नियंत्रक आणि नियंत्रित असे दोन वर्ग आपोआपच निर्माण होतात. या दोन वर्गात ज्या दिवशी भेद पूर्णत: नष्ट होईल तो दिवस सर्वोच्च महत्वाचा ठरेल.

**म्हणूनच गांधींजीवर लिहिलेल्या गद्य काव्यात बाबा आमटे म्हणतात, गांधी महात्म्य सांगून गांधी सांगता येणार नाही, उद्याच्या पिढयांना त्यांची ओळख पटण्यासाठी कदाचित कॉम्प्यूटर लागेल. पण काळाच्या भाळावर उमटलेली ही तप्त युगमुद्रा कोणत्याही इतिहासाला पुसून काढता येणार नाही.

No comments:

Post a Comment