- धनाजी जाधव, खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ या सहकार्यांच्या मदतीने छत्रपती शाहू यांनी राज्यकारभारास सुरुवात केली. बाळाजी विश्वनाथांनी मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांस छत्रपती शाहूंच्या पक्षात आणले. दिनांक १६ नोव्हेंबर, १७१३ रोजी बाळाजी विश्वनाथ यांस छत्रपतींनी पेशवाईची वस्त्रे दिली. महाराणी ताराबाईंनी आपली सत्ता कोल्हापूरमध्ये प्रस्थापित केली. त्यामुळे मराठी राज्याचे दोन तुकडे झाले. सातारा आणि कोल्हापूर.
- १७१९ मध्ये बाळाजी विश्वनाथ दिल्लीला गेले. त्यांनी बादशहाकडून छत्रपतींच्या नावे स्वराज्य, चौथाई, सरदेशमुखीच्या सनदा मिळविल्या. पेशव्यांनी मुघलांच्या कैदेतून छत्रपतींच्या मातोश्री येसूबाईंची सुटका केली. या सनदांमुळे दक्षिणेतील सहा मुघल सुभ्यांमध्ये चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार मराठ्यांना मिळाला. छत्रपतींचे पूर्वार्धातील आयुष्य मुघलांच्या कैदेत गेल्यामुळे ‘त्यांनी आपणास जिवंत ठेवले व वेळ येताच सोडले’ या गोष्टीचा छत्रपतींच्या मनावर परिणाम झाला असल्यामुळे त्यांनी ‘‘दिल्लीची पातशाही रक्षून राज्यविस्तार साधावा’’ असा सल्ला पेशव्यांना दिला.
- बालाजी विश्वनाथ : बाळाजी विश्वनाथांची आणखी एक महत्त्वाची कामगिरी म्हणजे त्यांनी मराठा मंडळ अर्थात संयुक्त राज्यव्यवस्थेची निर्मिती केली. या योजनेनुसार मराठा सरदारांना त्यांच्या त्यांच्या प्रभावक्षेत्रात मर्यादित स्वायत्तता देण्यात आली व स्वराज्याचा चौफेर विस्तार करण्यास प्रवृत्त करण्यात आले. अशा या अतुल पराक्रमी सेवकाचा मृत्यू सासवडला दिनांक २ एप्रिल, १७२० रोजी झाला.
- थोरले बाजीराव :त्यांच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र थोरले बाजीराव हे वंशपरंपरागत पद्धतीने पेशवे झाले. ते वडिलांच्या तालमीत तयार झाले होते. हे पेशवे आयुष्यात कधीही रणांगणावर पराभूत झाले नाहीत. त्या अर्थाने ते अजेय होते व मराठी सत्तेचे विस्तारक होते. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी निजामाचा पराभव केला, छत्रसाल राजाची संकटातून मुक्तता केली. बंडखोर मराठे सरदारांचा बंदोबस्त केला. सिद्दी-पोर्तुगीजांचा नक्षा उतरविला. गुजरात, माळवा, बुंदेलखंड, दिल्ली भागात भीमथडीची तट्टे नेली. ‘आकांक्षांपुढती गगन ठेंगणे’ अशी मराठी माणसाला अनुभूती दिली. गतिरुद्ध समाज आपसात संघर्ष करून संपतो, ही गोष्ट लक्षात घेऊन मराठी सरदारांच्या पराक्रमाला पेशव्यांनी आणि छत्रपतींनी नवे क्षितीज उपलब्ध करून दिले. या पेशव्यांच्या काळात दक्षिणाभिमुख असणारे मराठे ‘उत्तराभिमुख’ झाले. त्यामुळेच शनिवारवाड्याचे तोंड उत्तराभिमुख आहे. औरंगजेबाच्या मृत्यूने भारताच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झाली होती, ती मराठ्यांनी भरून काढली. अशा या पराक्रमी पेशव्याचा मृत्यू १७४० मध्ये झाला.
- बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब : त्यांचे ज्येष्ठ पुत्र बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे वंशपरंपरागत पद्धतीने पेशवे झाले. दुर्दैवाने या पेशव्यांनी मराठ्यांच्या साम्राज्याचा विनाशाची अकाली बीजे पेरली. इंग्रजांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या आरमाराचा त्यांनी इंग्रजांच्या मदतीने पूर्ण नाश केला. माळवा, राजपुताना भागातील हिंदू राज्यकर्त्यांना अकारण दुखविले. नागपूरकर भोसल्यांशी तंटा केला. पानिपतच्या स्वारीवर स्वत: जाऊन नेतृत्व करण्याऐवजी विश्वासराव, सदाशिवराव पेशव्यांना पाठवून स्वत:चा पराभव ओढवून आणला. अहमदशाह अब्दाली याने दिल्लीवर स्वारी केली असता, ‘हिंदुस्थान आमचा आहे आणि आम्ही तो सांभाळणारच’ या एकमेव उद्देशाने भारतातील एकमेव सत्ता लढली ती म्हणजे मराठ्यांची! पानिपतावरील पराभवाचा आघात नानासाहेब सोसू शकले नाहीत, त्यांचा अकाली मृत्यू झाला.
- थोरले माधवराव पेशवे: त्यांचे द्वितीय चिरंजीव थोरले माधवराव पेशवे सत्तेवर आले. १७६१ ते १७७२ इतकाच कालखंड या पेशव्याच्या वाट्याला आला. या पेशव्यांनी पानिपतच्या आघाताने मोडून पडलेली मराठी सत्ता सावरून धरली. शिंदे-होळकरांच्या कर्तृत्वास वाव दिला. काका रघुनाथराव पेशवे व जानोजी भोसले, हैदर आणि निजाम यांच्या महत्त्वाकांक्षेला त्यांनी लगाम घातला. १७७२ मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांना मूल नसल्याने त्यांचे धाकटे बंधू नारायणराव गादीवर बसले. त्यांच्या निमित्ताने मराठ्यांचे सत्ताकारण ज्या गोष्टीपासून मुक्त होते त्या गोष्टी - म्हणजे खून व रक्तपात - घडण्यास सुरुवात झाली.
- नारायणरावांचे काका रघुनाथराव यांनी पेशवेपदाच्या मोहाने गारद्यांच्या साहाय्याने नारायणरावांस ठार मारून पेशवेपद स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना राज्यात विरोध असल्याने नारायणरावांचे सुपुत्र सवाई माधवराव पेशवे यांस वयाच्या ४० व्या दिवशी पेशवेपदाची वस्त्रे देण्यात आली. सवाई माधवरावांच्या नावाने बारभाईंनी (नाना फडणीस, हरिपंत फडके, सखरामबापू बोकील, त्रंबकराव पेठे, मोरोबा फडणीस, बापूजी नाईक, मालोजी घोरपडे, भवानराव प्रतिनिधी, रास्ते, पटवर्धन, महादजी शिंदे, तुकोजी होळकर) कारभार पाहण्यास सुरुवात केली. नाना फडणीसांनी दक्षिण तर महादजींनी उत्तर सांभाळण्याचे ठरले परंतु १७९३ मध्ये शिंदे निधन पावले. १७९५ मध्ये सवाई माधवराव पेशव्यांनी शनिवारवाड्यात आत्महत्या केली. त्यामुळे रघुनाथराव पेशव्यांचे पुत्र दुसरे बाजीराव पेशवे १७९६ मध्ये पेशवे झाले ते १८१८ पर्यंत. २२ वर्षे पेशवेपद त्यांच्यापूर्वी कोणालाच मिळले नव्हते. १८०० मध्ये नाना फडणीसांचा मृत्यू झाला. शिंदे व होळकर यांच्यात वर्चस्वाचा संघर्ष सुरू झाला. १८०२ मध्ये दुसरे बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांबरोबर करार करून तैनाती फौजेची पद्धत स्वीकारली.
- इंग्रज-मराठे यांच्यात ३ युद्धे झाली, परंतु मराठ्यांच्या सत्तेचा नाश इंग्रजांनी घडवून आणला. मराठे हरले कारण ते प्रगत व विकसित होत चाललेल्या भौतिक संस्कृतीच्या प्रतिनिधींबरोबर १६-१७ व्या शतकात रेंगाळणार्या मनोवृत्तीने लढत होते. इंग्रज तोफा, बंदुका घेऊन लढत होते, तर मराठे ढाल-तलवार, भाले घेऊन लढत होते.
- इंग्रजांना औद्योगिक क्रांतीचे साहाय्य झाले. ‘ज्याचे हत्यार श्रेष्ठ, त्याची संस्कृती श्रेष्ठ’ हे मराठे विसरले. देशाभिमानाचा अभाव, ना धड उत्तर ताब्यात ना दक्षिण, प्रगत दळणवळण व्यवस्थेचा अभाव, सैन्यात शिस्त नाही, दिल्लीच्या गादीवर बसण्याची कुवत असूनही न दाखविलेली धमक, कार्यक्षम हेर यंत्रणेचा अभाव, कायमस्वरूपी कर्जे अशा अनेक कारणांमुळे मराठ्यांचा पराभव झाला. लुटालुटीने फार तर वेळा भागविल्या जातात, कायमची सोय होत नाही याचा मराठ्यांना विसर पडला म्हणून मराठे हरले. मराठ्यांनी केलेल्या चुकांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना अंतिमत: पराभव स्वीकारावा लागला.
No comments:
Post a Comment